कोल्हापूर : महापूर व अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीचे नुकसान ठरवण्यासाठी पंचनाम्याकरता जीआर काढला आहे, प्रत्यक्षात किती मदत द्यायची याचा अजून जीआरच निघालेला नाही, मग मोर्चे आंदोलने तरी कशाला काढता, अशी विचारणा करत पालकमंत्री सतेज पाटील यांनी दोन दिवसांत जीआर निघेल, त्यातील त्रुटी बघा आणि मग आंदोलनाचा निर्णय घ्या, २०१९ पेक्षा चांगली मदत आम्ही देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले व इचलकरंजी येथील काही भाग वगळता पंचनाम्याचे काम पूर्ण झाले आहे. पंचनामे कसे करावेत याबाबत मार्गदर्शन म्हणून राज्य शासनाने मागील पंधरवड्यात जीआर काढला आहे; पण तो मदतीचा नाही. मदतीसाठी राज्य सरकार स्वतंत्र जीआर काढणार आहे, त्याची मंत्रालयात तयारी पूर्ण झाली असून, दोन दिवसांत तो जाहीर केला जाणार आहे. यामध्ये २०१९ मध्ये शेतीच्या नुकसानभरपाईपोटी मिळालेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम यावेळी मदत म्हणून दिली जाणार आहे. दोन्ही वर्षांतील महापुरातील तुलना जीआर आल्यानंतरच शेतकऱ्यांनी करावी. तरीदेखील यात त्रुटी आढळल्यास त्या निदर्शनास आणून द्याव्यात, मोर्चे काढणे हा त्यावरचा उपाय नाही, ही पूर्णपणे राजकीय स्टंटबाजी आहे.
जिल्ह्यातील पूरग्रस्तांना नुकसाभरपाईपोटी पहिल्या टप्प्यात १७ कोटींचा निधी शासनाने दिला आहे. त्याचे वाटपही सुरू झाले आहे. आता दोन दिवसांत आणखी १७ कोटी रुपये मिळणार आहेत. पूरग्रस्तांना सर्वांत चांगला दिलासा महाविकास आघाडीचे सरकारच देत आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.