गेल्या दहा-बारा दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण जसे मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे, त्यावरूनच प्रशासनाचे प्रयत्न असफल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. गतवर्षी २०२० च्या एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण कोल्हापूर महापालिकेच्या हद्दीत सापडला आणि तेथून संसर्गाची साखळी निर्माण झाली. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ही साखळी तुटली अशी वाटत असतानाच कोरोनाची दुसरी लाट आली. सुस्त झालेली यंत्रणा आळस झटकून सज्ज होईपर्यंत कोरोना विषाणूने शहरातील सर्वच भागात आपले बस्तान बसविले.
वास्तविक दुसरी लाट येणार असल्याचे आणि कोल्हापूर शहरातील अनेक भाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरणार असल्याची पूर्वसूचना केंद्र व राज्य सरकारने दिले असताना जानेवारी, फेब्रुवारी व मार्च अशा तीन महिन्यांत पूर्वतयारी करून ठेवण्याची आवश्यकता होती, परंतु प्रशासनाने काहीही केले नाही. रुग्ण वाढतील तशी व्यवस्था करु, असे सांगत प्रशासन वेळ मारुन नेत राहिले. त्यामुळे व्हायचा तो गोंधळ झालाच. दि. १ एप्रिलपासून महापालिका क्षेत्रात रोज शंभरच्या पुढे नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून यायला लागले. रोज १००, २००, ३०० रुग्ण आढळून यायला लागले तरी यंत्रणा संथगतीने काम करत आहे.
-गृहअलगीकरण मोठी चुूक -
सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दुसऱ्या लाटेवेळी एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आली तरी त्यांना घरात अलगीकरणास परवानगी देण्यात आली. हीच मोठी घोडचूक ठरली. तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देऊन सौम्य लक्षणे तसेच कोणतीच लक्षणे नसलेल्या बाधित रुग्णांना घरात अलगीकरण होण्यास परवानगी देण्यात आली; परंतु घडले उलटेच. त्याच घरातील चार ते पाच व्यक्ती संसर्गामुुळे बाधित झाल्या. बाधितांच्या घरातील अन्य व्यक्ती खुलेआम बाजारपेठेत खरेदी, सार्वजनिक ठिकाणचा प्रवास करू लागल्या. समाजात मिसळून राहू लागल्या. त्यामुळे संसर्ग रोखण्याऐवजी तो अधिक गतीने फैलावण्यास सुरुवात झाली.
एप्रिल, मे महिन्यात विस्फोट-
यावर्षी पालिका क्षेत्रात जानेवारीत २२५ ,फेब्रुवारीत ३४३, मार्चमध्ये ८१६ कोरोनाबाधित नवे रुग्ण समोर आले. त्यानंतर एप्रिल व मे हे दोन महिने शहराच्या दृष्टीने अतिशय घातक ठरले. एप्रिल महिन्यात ५४४७ तर दि. १८ मेअखेर ५२२३ नवीन रुग्णांची भर पडली. म्हणजेच दोन महिन्यात कोरोना संसर्गाचा महाभयंकर उद्रेक झाला आणि नेमकी याचकाळात प्रशासकीय यंत्रणा कमी पडली आहे.
संपर्कातील व्यक्तींचा शोध कुठाय?
एखादा कोरोना रुग्ण आढळून आला तर त्याच्या नजिकच्या संपर्कातील व्यक्तींची सक्तीने आरटीपीसीआर चाचणी करण्याच्या सूचना आहेत; परंतु नजीकच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणेच आता बंद झाले आहे. एप्रिल आणि मे महिन्यात शहरात १० हजार ५०० नवे बाधित रुग्ण आढळले आहेत, त्यांच्या संपर्कातील पाच जरी व्यक्तींची चाचणी करायची झाली असती तर किमान ५० हजार चाचण्या व्हायला पाहिजे होत्या. पण इतक्या मोठ्या संख्येन चाचण्या झालेल्या नाहीत, हे स्पष्ट आहे.
-प्रोटोकॉल बासनात, अधिकारी बैठकीत
कागदोपत्री नियोजन करण्यात प्रशासन आघाडीवर आहे, परंतु प्रत्यक्षात काहीच काम झाले नाही. प्रोटोकॉलनुसार जेव्हा रुग्ण सापडतो त्यावेळी त्याला नेण्यासाठी रुग्णवाहिका दारात पोहोचायची. तेथील भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला जायचा. तेथे औषध फवारणी केली जायची. रुग्णाच्या नजीकच्या संपर्कातील व्यक्तींचे सक्तीने स्राव घेऊन त्याचे अहवाल येईपर्यंत संस्थात्मक विलगीकरणात रवानगी व्हायची. जरी अहवाल निगेटिव्ह आला तरी चौदा दिवस गृहअलगीकरणात राहण्याची सक्ती व्हायची. दारावर ‘होम क्वारंटाईन’चे स्टीकर लावले जायचे. प्रभाग सचिवांचे त्यांच्यावर नियंत्रण असायचे. परगावांहून कोण आले याची नोंदी व्हायच्या. पण आता यातील काहीही होत नाही. सगळ बेभरवशावर आहे.