गेल्या दोन वर्षांपासून निपाणी फोंडा मार्गाचे काम अत्यंत संथगतीने सुरू होते ते गेल्या १५ दिवसांपासून पूर्णतः बंद झाले होते. अर्धवट असलेल्या कामे, खोदून ठेवलेले पूल यामुळे या मार्गावरून प्रवास करताना जीव मुठीत घेऊनच करावा लागतो. ठेकेदारांच्या कामाच्या दिरंगाईबद्दल आणि या कामाकडे होत असलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ आज सुरुपली- कुरुकली दरम्यानच्या खोदून ठेवलेल्या पुलावरच आंदोलन केले.
आंदोलनाची नोटीस देऊनही सार्वजनिक बांधकाम खात्याचे किंवा ठेकेदारांचे कोणीच प्रतिनिधी निर्धारित वेळेत न आल्याने आंदोलनकर्ते आक्रमक झाले होते. कार्यकारी अभियंता व ठेकेदाराचे देशपांडे आल्याशिवाय रस्त्यावरून न उठण्याचा पवित्रा घेतला होता. तब्बल दीड तासाने अधिकारी आंदोनलस्थळी आले, तेव्हा आंदोलनकर्त्यांनी प्रश्नांचा भडीमार करीत बंद पडलेल्या व निकृष्ट झालेल्या कामाचा जाब विचारला. त्यावेळी आंदोलनकर्त्यांसमोर बोलताना कार्यकारी अभियंता तुषार बुरुड व ठेकेदराचे प्रतिनिधी देशपांडे यांनी कुरुकली ते मुरगूडपर्यंतचा रस्ता व त्यावरील सर्व पुले येत्या मार्चअखेर पूर्ण करून देऊ, असे आश्वासन दिले. दीड तास चाललेल्या या आंदोलनामुळे या मार्गावर वाहनाच्या मोठा रांगा लागल्या होत्या. काही काळ आंदोलनकर्त्यांची समजूत काढून मुरगूड पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. या आंदोलनाचे नेतृत्व दत्ता पाटील केनवडेकर, जयवंत पाटील, संजय पाटील कुरुकलीकर आदींसह चार गावांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी केले. यावेळी जि.प. सदस्या शिवानी भोसले, पंचायत समितीचे सदस्य विजय भोसले, माजी सदस्य आर. डी. पाटील आदींसह सुरुपली, कुरुकली, सोनगे, बेणिक्रे आदी गावांचे आजी- माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि विशेषतः तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.
फोटो ओळ :- निपाणी फोंडा मार्गाचे निकृष्ट आणि रखडलेले व बंद असलेले काम तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी आज कुरुकलीजवळ परिसरातील सर्व गावांतील ग्रामस्थांनी रस्त्यातच ठाण मांडून रस्ता रोखून धरला.