कोल्हापूर : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी जिल्ह्यातील अनेकांनी इच्छा व्यक्त केली आहे. नव्या वर्षातील पहिल्याच आठवड्यात काहीजणांचे प्रवेश अपेक्षित आहेत. दोन जानेवारीनंतर या प्रक्रियेला गती येणार असून कमळच्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. फेबु्रवारीमध्ये जिल्हा परिषदेसाठी मतदान होणार आहे. सध्या जिल्हा परिषदेत काँग्रेस-स्वाभिमानीची सत्ता आहे. मात्र, केंद्रात, राज्यात सत्ता असताना आता जिल्हा परिषदेतही सत्ता मिळावी यासाठी भाजपने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कंबर कसली आहे. दोन्ही शासनाकडून निधी आणायचा; परंतु स्थानिक स्वराज्य संस्था मात्र दोन्ही काँग्रेसच्या ताब्यात अशी स्थिती असल्याने महानगरपालिका नसली तरी आता जिल्हा परिषदेत सत्तांतरासाठी भाजप इच्छुक आहे. काँग्रेसमध्ये पी. एन. पाटील, सतेज पाटील आणि याआधी महादेवराव महाडिक या तिघांच्या राजकारणामध्ये कोंडी झालेले, राष्ट्रवादीमध्ये हसन मुश्रीफ यांची असलेली एकाधिकारशाही पसंद नसलेले, पंचक्रोशीमध्ये विविध संस्थांच्या सहकार्याने आपले स्वतंत्र स्थान निर्माण केलेले नेते आणि प्रबळ कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घेऊन पक्षाचे जि. प. सदस्य निवडून आणण्यासाठी नियोजन सुरू केले आहे. सर्व ६७ जागा भाजपनेच लढविण्यापेक्षा स्वाभिमानी, आरपीआय आठवले गट, महादेवराव महाडिक यांची ताराराणी आघाडी, जनुसराज्य यांना सोबत घेऊन सामूहिक महाआघाडी उभारण्याला चंद्रकांतदादा पाटील यांचे प्राधान्य आहे. त्यामुळे या गटांना न दुखावता भाजप प्रवेश करून घेणे, त्यांना पदांची सोय करणे, त्यांच्या येण्याने कितपत फायदा होणार आहे, त्यांच्या येण्याने पक्षातील मूळ कार्यकर्ते दुखावता कामा नयेत, अशी दक्षता घेत हे काम सुरू आहे. (प्रतिनिधी)हाळवणकर, बाबा देसाई, शेळकेंचे नियोजनपूर्वीपासून ग्रामीण कोल्हापूरशी नाळ असलेले भाजपचे संघटन मंत्री बाबा देसाई, आमदार सुरेश हाळवणकर आणि सध्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके यांनी तालुकावार अनेक नेते, कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून, इच्छुकांशी चर्चा करून त्यांच्या अपेक्षा जाणून घेऊन काही प्रस्तावित नावे तयार केली आहेत. एक सप्टेंबरला चंद्रकांतदादांशी चर्चा होऊन यातील काही नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होईल, असे दिसते. इंगवले, अनिल यादव, राहुल देसाई यांच्या नावांची चर्चासध्या तरी जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ सदस्य अरुण इंगवले, माजी आमदार बजरंग देसाई यांचे चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य राहुल देसाई, शिरोळचे अनिल यादव यांच्या नावांची चर्चा जोरात सुरू आहे. मात्र, याबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे समजते. चराटी यांच्यावर दबावआजरा साखर कारखान्याचे चेअरमन अशोक चराटी यांनी भाजपमध्ये यावे यासाठी गेले काही महिने प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आजऱ्यात ज्या पद्धतीने हसन मुश्रीफ यांच्याविरोधात आघाडी करून साखर कारखाना ताब्यात घेण्यात आला ते पाहून चराटी यांच्या संघटनकौशल्यावर दादा खूश आहेत. भाजपमध्ये आल्यास त्यांना मोठे पद देण्याचीही तयारी ठेवण्यात आली आहे. मात्र, अजूनही चराटी त्या मानसिकतेत नसल्याचे दिसते.
नव्या वर्षात भाजपमध्ये ‘इनकमिंग’ची तयारी
By admin | Updated: December 30, 2016 00:57 IST