कोल्हापूर : बँक आपल्या ग्राहकांना जलद, सुलभ व वाजवी खर्चात विविध सुविधा देण्यासाठी सदैव तत्पर आहे. गृहकर्जे, वाहनकर्जे, मालमत्ता तारण कर्जे, आदींच्या वाढत्या मागणीमुळे बँक आॅफ इंडियाने आपला ‘रिटेल बँकिंग विभाग’ सुरू करून ग्राहकांसाठी नवे दालन निर्माण केले आहे, असे प्रतिपादन बँकेच्या नॅशनल बँकिंग गु्रप (पश्चिम)चे सरव्यवस्थापक तरलोचन सिंह यांनी केले. येथील राजाराम रोडवरील मिड कॉर्पाेरेट शाखेमध्ये रिटेल बँकिंग विभागाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. तरलोचन सिंह म्हणाले, ग्राहकांना तत्पर निर्णय आवश्यक असतो. कारण दिवसेंदिवस प्लॉट व फ्लॅटच्या किमती तसेच अद्ययावत वाहनांमुळे ग्राहकांची कर्जमागणी प्रचंड आहे. कर्ज मंजुरीसाठी होणारा विलंब हा सर्वच बँकांच्या चिंतेचा विषय झाला आहे. यावर मात करण्यासाठी बँकेने हा विभाग सुरू केला आहे. यामध्ये कर्जाची कमाल मर्यादा पाच कोटी, तर अल्प व्याजदर, विनाशुल्क व्यक्तिगत अपघात विमा संरक्षण, कर्ज परतफेडीचा कालावधी जास्तीत जास्त ३० वर्षे आहे. मासिक हप्ता प्रतिलाखास ८९३ रुपये इतका आहे, तर स्थावर तारण कर्जासाठी कमाल मर्यादा पाच कोटी रुपये आहे. यासाठी परतफेड कालावधी जास्तीत जास्त बारा वर्षे इतका आहे. बँकेचे विभागीय व्यवस्थापक आर. गणेशन म्हणाले, या विभागात वरिष्ठ श्रेणी व्यवस्थापकांची नेमणूक केली आहे. कर्जमंजुरी जलद होण्यासाठी निष्णात अधिकारी तसेच विविध सेवांची व योजनांची माहिती देण्याकरिता तज्ज्ञ अधिकारीवर्ग नेमला आहे. बँकेचे उपविभागीय व्यवस्थापक दुलेखान पठाण यांच्यासह अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. (प्रतिनिधी)बँक आॅफ इंडियाच्यावतीने कोल्हापूर येथे राजाराम रोड शाखेमध्ये ‘रिटेल बँकिंग’चे उद्घाटन बँकेच्या नॅशनल बँकिंग गु्रप (पश्चिम)चे सरव्यवस्थापक तरलोचन सिंह यांच्या हस्ते झाले. यावेळी विभागीय व्यवस्थापक आर. गणेशन, उपविभागीय व्यवस्थापक दुलेखान पठाण, आदी उपस्थित होते.
‘रिटेल बँकिंग सेल’ ग्राहकांसाठी नवे दालन : तरलोचन सिंह
By admin | Updated: August 22, 2014 00:51 IST