पाचगाव : तत्त्वनिष्ठेला जपून नि:स्वार्थीपणे व प्रामाणिकपणे काम करून समाजापुढे व प्रशासनासमोर आदर्श ठेवणारे निवृत्त शिक्षण उपसंचालक म्हणजे नानासाहेब माने होय, असे उद्गार कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी काढले. अग्निदिव्य पुस्तक प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते.
सतेज ऊर्फ बंटी पाटील म्हणाले, एक शिक्षणाधिकारी काय करू शकतो हे नानासाहेब माने यांनी त्यांच्या काळात करून दाखविले आहे, आताच्या शिक्षणाधिकाऱ्यांना त्यांच्याकडून प्रशिक्षण दिले पाहिजे, त्यांनी लिहिलेले पुस्तक म्हणजे त्यामध्ये मांडलेले परखड विचार आणि अनुभव आहेत, ही पुस्तके मी स्वतः खरेदी करून महाराष्ट्रातील शिक्षणाधिकाऱ्यांना व शिक्षण संचालकांना भेट देणार आहे, त्यांनी या पुस्तकाचे वाचन करून त्याप्रमाणे प्रशासनात काम करावे याचा फायदा विद्यार्थ्यांपर्यंत नक्कीच होईल यात शंका नाही, नानासाहेब मानेंची पाठपुरावा करण्याची पद्धत व कामातील चिकाटी या जोरावरच त्यांनी हे यश संपादन केले असल्याचेही त्यांनी सांगितले.
चंद्रदीप नरके म्हणाले, शिक्षण क्षेत्रासारख्या क्षेत्रात काम करताना कोणाच्याही दबावाला बळी न पडता नियमाप्रमाणे सरळ रेषेत राहून ज्यांनी काम केले ते म्हणजे नानासाहेब माने, कशाचीही तमा न बाळगता कोणत्याही मंत्री व आमदार खासदार यांना न जुमानता नियमाप्रमाणे काम केले, या धावत्या जगात त्यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची खऱ्या अर्थाने समाजाला गरज आहे.
यावेळी माजी शिक्षण संचालक सर्जेराव जाधव, शिक्षण संचालक एस. जे. खतीब, एम. आर. कदम, महावीर माने, एच. आय. शिंदे, पाचगावचे सरपंच संग्राम पाटील, मोरेवाडीच्या सरपंच शिला परीट, उपसरपंच दत्तात्रय भिलुगडे, माजी सरपंच अमर मोरे, सुनील शिंदे, मयूर पाटील, सुदर्शन पाटील, तसेच शिक्षण क्षेत्रातील अधिकारी व भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट -
बऱ्याच काळानंतर सतेज पाटील व चंद्रदीप नरके एका व्यासपीठावर,
गोकुळच्या लढ्यात खांद्याला खांदा लावून आत घुसणारे सतेज पाटील व चंद्रदीप नरके विधानसभेनंतर आज या पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी एकाच व्यासपीठावर आल्याची चर्चा कार्यकर्त्यांत रंगली होती. चंद्रदीप नरके यांनी बोलता बोलता चिमटेही काढले.
फोटो ओळ : शिक्षण उपसंचालक नानासाहेब माने लिखित अग्निदिव्य पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी कोल्हापूरचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी शिक्षण संचालक सर्जेराव जाधव, आदी उपस्थित होते.