कुंभोज : येथील भूमापन कार्यालयातंर्गत येणाऱ्या सात गावांसाठी कामाचे दिवस आठवड्यातून केवळ दोनच असून, मिळकतधारकांची कामे वेळेवर होत नसल्याने त्यांच्यावर ताटकळण्याची वेळ येत आहे. परिणामी वर्षानुवर्षे बाहेरगावच्या नागरिकांच्या नशिबी आधी हेलपाटे, मग हातात काम, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सुमारे पंचवीस हजार लोकवस्तीच्या कुंभोजसह मजले, नेज, वाठार तर्फ उदगाव, खोची, नरंदे, सावर्डे अशा दहा किलोमीटर परिसरातील सात गावांच्या कुंभोज येथील भूमापन कार्यालयाकडे ७४४७ मिळकती आहेत. प्राॅपटी कार्डशिवाय वारस, बोजा तसेच खरेदी नोंदीची महिन्यास सुमारे पन्नास प्रकरणांची आवक असते. या सर्व कामांच्या पूर्ततेसाठी किमान एक ते दीड महिन्यांचा अवधी लागतो.
तथापि, या कार्यालयाचे कामकाज आठवड्यातून केवळ बुधवार व शुक्रवारी असे दोन दिवस असते. एका परिरक्षण अधिकाऱ्यासह शिपायावर कार्यालयाची भिस्त आहे. सध्या कार्यालयात मोजणीची चार, तर नोंदीची चाळीस प्रकरणे प्रलंबित आहेत. परिणामी दोन दिवसांत सर्व गावांतील मिळकतधारकांच्या कामाचा निपटारा कार्यालयाकडून वेळेत होत नसल्याने नागरिकांना हेलपाटे मारण्याबरोबरच कार्यालयासमोर अनेकदा तासन्तास ताटकळत बसावे लागत आहे. कार्यालयीन कामाचे दिवस वाढवून होणारा त्रास थांबवावा, अशी मागणी सात गावांतील मिळकतधारकांतून सातत्याने होत आहे.
अनेक वर्षांपासून येथील भूमापन कार्यालयाकडून कामांच्या दिरंगाईमुळे सात गावांच्या नागरिकांच्या नशिबी केवळ हेलपाटे मारणे आणि तिष्ठत राहणे आले आहे. सध्याचे दोन दिवस तेही पूर्णवेळ सुरू न राहणाऱ्या या कार्यालयाचे कामकाजाचे किमान आणखी दोन दिवस वाढवावेत.
- आप्पासाहेब एडके, तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना हातकणंगले.
फोटो ओळी- कुंभोज येथील भूमापन कार्यालयाबाहेर नेहमी अशी गर्दी असल्याने नागरिकांना तासन् तास ताटकळत बसावे लागते.