हातकणंगले : तिळवणी, मजले, तारदाळ, हातकणंगले परिसरातील मुरमाची शासकीय रक्कम न भरताच रात्रीच्या वेळी राजरोसपणे चोरी केली जात आहे. याकडे मंडल निरीक्षक, गावकामगार तलाठी यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केल्यामुळे निसर्गप्रेमी, ग्रामस्थांनी तहसीलदार हातकणंगले यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. तहसीलदार दीपक शिंदे यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले. हातकणंगले परिसरातील पडसर व गायरान जमिनीचे मोठे क्षेत्र आहे. त्यामुळे एजंटगिरी करण्यात पटाईत असलेल्या दलालांना हाताशी धरून इचलकरंजी व परिसरातील बांधकाम व्यावसायिकांकडून सायझिंग शेड, यंत्रमाग शेड, मोठमोठ्या इमारतींसाठी मुरमाची चोरी केली जात आहे. हातकणंगले तहसील कार्यालयाकडील रॉयल्टी विभागाचे प्रमुख तसेच तिळवणी, मजले तारदाळ, हातकणंगले गावचे तलाठी व संबंधित मंडलाधिकारी यांचे या मुरूम चोरीकडे दुर्लक्ष आहे. परिणामी रात्रपाळीने मुरमाची पळवापळवी सुरू असते. यामुळे शासनाचे रोज लाखो रुपयांचे नुकसान होते. तहसील कार्यालयाकडील रॉयल्टी लिपिकाकडून शासकीय चलन भरणा केल्याशिवाय सर्वसामान्य नागरिक व शेतकरी यांना मुरमाची परवानगी दिली जात नाही. मग बांधकाम व्यावसायिकांना मात्र रात्रीची परवानगी कशी दिली जाते याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. बेकायदा उत्खनन रोखण्यासाठी आता ग्रामस्थ सरसावले आहेत. हातकणंगले परिसरातील पडसर व शेतकरी वर्गाच्या शेतजमिनीवरील बेकायदेशीर मुरूम चोरीची दखल हातकणंगले तहसीलदार दीपक शिंदे यांनी घेतली असून, शासकीय भरणा न करता मुरूम चोरी करणाऱ्या टोळीचा छडा लावण्याचा निर्णय घेतला आहे.
मुरमाची राजरोसपणे चोरी
By admin | Updated: April 15, 2015 00:40 IST