घटस्थापनेच्या मुहूर्तावर ‘‘मुंबई-कोल्हापूर-मुंबई’ विमानसेवा सुरु

By संदीप आडनाईक | Published: October 15, 2023 03:48 PM2023-10-15T15:48:02+5:302023-10-15T15:49:11+5:30

खासदार महाडिक यांच्या हस्ते मुंबईला जाणाऱ्या कोल्हापूरातील प्रवाशांना एअरवेजतर्फे गिफ्ट हॅम्पर्स आणि बोर्डिंगपास देण्यात आले

"Mumbai-Kolhapur-Mumbai" flight service started on the occasion of Ghatasthana | घटस्थापनेच्या मुहूर्तावर ‘‘मुंबई-कोल्हापूर-मुंबई’ विमानसेवा सुरु

घटस्थापनेच्या मुहूर्तावर ‘‘मुंबई-कोल्हापूर-मुंबई’ विमानसेवा सुरु

कोल्हापूर : नवरात्रोत्सवात घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर कोल्हापूर विमानतळावरून रविवारी सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांनी स्टार एअरवेजचे विमान मुंबईकडे झेपावले. या विमानाने कोल्हापूरातून जाणारे ६० प्रवासी तासाभरात मुंबईत पोहोचले. हे विमान अकरा वाजून पन्नास मिनिटांनी मुंबई विमानतळावर उतरले. तत्पूर्वी बंगळूरुहून आलेल्या या विमानाचे कोल्हापूर विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी 'वॉटर सॅल्यूट'ने स्वागत केले.

खासदार धनंजय महाडिक, स्टार एअरवेज एअरलाईन्सचे अधिकारी, कर्मचारी, कोल्हापूर विमानतळाचे व्यवस्थापक अनिल शिंदे आणि उत्साही कोल्हापूरकरांच्या उपस्थितीत या विमानाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत ही सेवा सुरु झाली. स्टार एअरवेजच्या एम्ब्रायर जेट जातीचे ईआरजे १७५ हे ७९ आसनी विमान बंगळूरुहून १० वाजून २० मिनिटांनी कोल्हापूरात दाखल झाले. या विमानाने सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी बंगळूरुहून उड्डाण केले होते. यात ४० प्रवासी होते. कोल्हापुरातून १० वाजून ५० मिनिटांनी निघालेले हे विमान मुंबईला ११ वाजून ५० मिनिटांनी पोहोचले. यात कोल्हापूरचे  ६० प्रवासी होते. ते दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी मुंबईहून निघणार होते, मात्र उशिरा निघाले. याच विमानाने ५ वाजून १० मिनिटांनी बंगळूरुकडे उड्डाण केले.

सर्वात छोटा प्रवासी
खासदार महाडिक यांच्या हस्ते मुंबईला जाणाऱ्या कोल्हापूरातील प्रवाशांना एअरवेजतर्फे गिफ्ट हॅम्पर्स आणि बोर्डिंगपास देण्यात आले. या विमानातून अमरेंद्र महाडिक या एक वर्षाचा सर्वात छोट्या प्रवाशाने प्रवास केला. त्याच्यासोबत वडील पृथ्वीराज आणि आई वैष्णवी होते. बिझनेस क्लासमधून प्रवास करणाऱ्यांमध्ये  कोल्हापूरातील टूर ॲन्ड ट्रॅव्हल्स एजन्सीच्या ९ प्रतिनिधींसह १२ प्रवाशांचा समावेश होता.

Web Title: "Mumbai-Kolhapur-Mumbai" flight service started on the occasion of Ghatasthana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :airplaneविमान