कऱ्हाड : ‘राज्यातील १८ टक्के क्षेत्र सिंचनाखाली तर ८२ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. तरीही माहिती तंत्रज्ञानाचा वापर केल्याने शेतीउत्पन्नात कमालीची वाढ झाली आहे. नव्याने होऊ घातलेला मुंबई-बंगळूर कॉरिडॉर पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाला वरदान ठरणार आहे. यशवंतराव चव्हाण यांनी सहकार चळवळ उभी केली. त्यामुळे महाराष्ट्र उत्पादनात इतर राज्याच्या तुलनेत प्रथम क्रमांकावर आहे. राज्याचे औद्योगिक धोरणही विकासात्मक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. येथील शेतीउत्पन्न बाजार समितीच्या आवारात उभारण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. परिवहनमंत्री मधुकरराव चव्हाण, आमदार जयकुमार गोरे, आमदार आनंदराव पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, पंचायत समितीचे सभापती देवराज पाटील, जनता बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, रजनी पवार, जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन., जिल्हा उपनिबंधक आनंद कटके, धैर्यशील कदम, सभापती दाजी पवार, उपसभापती सुनील पाटील, गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष दिलीप पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री म्हणाले, ‘औद्योगीकरणामुळे राहणीमान वाढून जनतेला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. राज्यातील गावे टँकरमुक्त करण्यासाठी साखळी बंधारे उभारणे गरजेचे आहे. राज्याला पाणीटंचाईमुक्त करण्याचे आव्हान शासनाने स्वीकारले असून, उद्याचा शेतकरी प्रगतिशील बनण्यासाठी विविध योजना राबविल्या आहेत. गुजरातपेक्षा महाराष्ट्र उत्पादनात आघाडीवर आहे. राज्यशासनाने आरोग्य सुविधा दिल्या आहेत. इतर राज्यांपेक्षा आपल्या राज्यात ७५ टक्के कापूस पिकतो. त्यामुळे नवीन वस्त्रोद्योग धोरण राबवीत आहोत.’मधुकरराव चव्हाण म्हणाले, ‘सातारा जिल्ह्याने राज्याला पारदर्शक कारभार करणारे नेतृत्व दिले आहे. यशवंतराव चव्हाण यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभारून सत्तेचे विकेंद्रीकरण केले. ग्रामीण भागातील जनतेच्या हातात नेतृत्व करण्याची उमेद त्यांनी दिली. सहकार चळवळीतून कारखानदार, व्यापारीवर्ग उभारून त्यातून ग्रामीण भागाचा विकास साधला.’ यावेळी मदनराव मोहिते, आमदार आनंदराव पाटील, आमदार बाळासाहेब पाटील यांची भाषणे झाली. (प्रतिनिधी)
दुष्काळी भागासाठी मुंबई-बंंगळूर कॉरिडॉर : चव्हाण
By admin | Updated: July 27, 2014 22:07 IST