कोल्हापुर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट- ब सेवा मुख्य परीक्षेतील पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी मंगळवारी जाहीर झाली. यात कोल्हापूर जिल्ह्यातील सातपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. एमपीएससीने पीएसआय संवर्गातील ३७४ पदांसाठी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी परीक्षा घेतली होती. त्यानुसार एमपीएससीने २१८ विद्यार्थ्यांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी संकेतस्थळावर जाहीर केली. यात खोकुर्ले पैकी पडवळवाडी (ता. गगनबावडा) येथील प्रशांत आनंदा इंजर, इचलकरंजी येथील अर्चित मकोटे, संजय मोहन रायमाने, तुरंबे (ता. राधानगरी) येथील संकेत संजय देवर्डेकर, विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे विद्यार्थी अंबप पाडळीचे ऋतुराज रघुनाथ मेथे- पाटील, सुशांत मोहन चिंदगे, व कसबा बावडा येथे राहणारा अक्षय शशिकांत जाधव यांनी यश मिळवले.सर्वसामान्य कुटुंबातील पाेरांनी फडकवला झेंडाअर्चित मकोटे : सन २०२३ साली झालेल्या परीक्षेत अर्चित याने बी.टेक इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. तो येथील इचलकरंजीतील लक्ष्मी-व्यंकटेशनगर जुना चंदूर रोड येथे राहण्यास असून आई गृहीणी, तर वडील स्वत:चा व्यवसाय करतात. विशेष मागास प्रवर्गात ते अव्वल ठरले आहेत. तुरंबे येथील संकेत देवर्डेकर याची पहिल्याच प्रयत्नात पीएसआयपदी निवड झाली. त्याचे प्राथमिक शिक्षण गावातील कुमार विद्यामंदिर येथे झाले, तर सोळांकुर येथील यशवंतराव पाटील महाविद्यालयातून रसायनशास्त्र विषयातून पदवी घेतली.
अक्षय शशिकांत जाधव हा कसबा बावडा येथील मराठा कॉलनीत काकांकडे राहून शिक्षण घेत आहे. त्याने बीएस्सी विवेकानंद कॉलेजमधून केले आहे. बावड्यात स्वतंत्र खोली घेऊन अभ्यास करण्यास सुरुवात केली. पहिल्याच टर्ममध्ये पीएसआयपदी निवड झाली. शेतकऱ्याच्या पोराने फेडले पांगखोकुर्ले पैकी पडवळवाडी येथील शेतकरी कुटुंबातील प्रशांत इंजरचे प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत झाले. तर असळज येथील उदयसिंह ऊर्फ बाळ पाटील विद्यालयात त्याने माध्यमिक शिक्षण घेतले. विज्ञान शाखेतून कोल्हापूर येथील महाराष्ट्र अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये उच्च माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर गगनबावड्यातील आनंदी महाविद्यालयातून त्याने पदवीचे शिक्षण पूर्ण केले. परीक्षेची तयारी करीत असताना आई-वडिलांची प्रेरणा मिळाल्याचे त्याने सांगितले.