कोल्हापूर : महापालिका, आयआरबी व एमएसआरडीसी यांच्यात सुकाणू समितीमध्ये ठरल्याप्रमाणे शहरातील विविध अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी महापालिकेने आयआरबीला एक महिन्याची नोटीस बजावली आहे. ३० एप्रिलपर्यंत कामे सुरू न झाल्यास ही चालू कामे महापालिका करून घेणार आहे तसेच त्याचे पैसे चालू बाजारभावाप्रमाणे आयआरबीच्या २५ कोटी रुपयांच्या अनामत रकमेतून वसूल करणार असल्याचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी ‘लोकमत’ला सांगितले.आयआरबीने अपूर्ण ठेवलेल्या कामामुळेच रंकाळा येथील तांबट कमानसमोरील रस्ता गेली चार वर्षे रखडला आहे. रंकाळ्याच्या उत्तरेकडील दारातील डी-मार्टच्या समोरील रस्त्यासह चॅनेल्सचे कामे रखडल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. महिन्याभरात ही कामे मार्गी लागणार आहेत. महापालिका ही कामे करून घेऊन त्याचे पैसे सध्याच्या बाजारभावाप्रमाणे आयआरबीच्या २५ कोटी रुपयांच्या अनामत रकमेतून बिलेवजा केली जाणार आहेत. गेल्या अडीच वर्षांत ‘आयआरबी’ने शहरातील रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्तीची कामे केलेली नाहीत. बंद पडलेले दिवे, गटर्स व चॅनेलची दुरुस्ती, अपूर्ण पदपथ, बसथांबे, देखभालीच्या कामांसह अपूर्ण कामे करण्याचा दबाव ‘आयआरबी’वर वाढला आहे. येत्या महिन्यात ही सर्व अपूर्ण कामे सुरू करावी लागतील किंवा महापालिकेला ती करण्यासाठी परवानगी द्यावी लागणार आहे तसेच दर महिन्याला आयआरबी, महापालिका व एमएसआरडीसी यांच्यात होणाऱ्या सुकाणू समितीच्या बैठकीत केलेल्या कामांचा अहवाल सादर केला जाणार आहे. (प्रतिनिधी)
‘आयआरबी’ला महिन्याची नोटीस
By admin | Updated: April 3, 2015 01:03 IST