'इमामे हसन आणि इमामे हुसेन' यांच्या बलिदानानिमित्त त्यांचा स्मृती जागविणारा आणि हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असणारा मोहरम सण कोरोनामुळे शहर व तालुक्यात साधेपणाने साजरा करण्यात आला.
शहरातील मकानदार मोहल्ला, खलिफ मोहल्ला, मुल्ला मस्जिद व चावडी येथे पंजे व नालसाब यांची प्रतिष्ठापना करण्यात आली. खत्तल रात्री खाई फोडणेचा विधी झाला.
कोरोनामुळे पंजे व नालसाब भेटीची मिरवणूक रद्द करून पारंपरिक पद्धतीने नेहरू चौकात ताबू भेट झाली.
याप्रसंगी जग कोरोनामुक्त होऊ दे आणि सर्वत्र शांती व समृद्धी नांदावी यासाठी प्रार्थना करण्यात आली.
यावेळी पारंपरिक पद्धतीने नदी घाटावर तांबूतांचे विसर्जन न करता भेटीच्या ठिकाणीच विसर्जन करण्यात आले. त्यानंतर 'अलविदा-ओ-अलविदा, शाहे शहीदा अलविदा' या स्मृतीगीताने मोहरमची सांगता झाली.
याकामी शब्बीर मकानदार, रमजान मकानदार, आशपाक मकानदार, सलीम खलिफ, मन्सूर मुल्ला, महमहशफी मुल्ला, अकबर मुल्ला यांनी परिश्रम घेतले.
दरम्यान, करंबळी, ऐनापूर, हलकर्णी, तेरणी, कडगाव, लिंगनूर, गिजवणे, निलजी, नूल, महागाव, नेसरी याठिकाणीही मोहरम साधेपणाने साजरा करण्यात आला.
फोटो ओळी : मोहरमनिमित्त गडहिंग्लज शहरातील नेहरू चौकात पारंपरिक पद्धतीने सवाद्य ताबूत भेटीचा कार्यक्रम झाला. यावेळी उपस्थित मुस्लीम बांधव. (किल्लेदार फोटो)
क्रमांक : २००८२०२१-गड-०४