कोल्हापूर : ‘दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांनी कोल्हापुरात काॅंग्रेस जिवंत ठेवण्याचे काम इमाने-इतबारे केले. आता त्यांची मुले राजकीय भवितव्याचा विचार करून राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. आमदार सतेज पाटील यांनी त्यांना सहकार्य करता येणार नसेल तर किमान अपशकुन करून अडथळा आणू नये, त्यांना आशीर्वाद द्यावेत’, असा टोला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी हाणला.मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘पाटील बंधूंच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसला हत्तीचे बळ मिळणार असून, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत त्याचा निश्चितच फायदा होईल. शक्तिपीठबाबतची भूमिका मुख्यमंत्र्यांनी लपवून ठेवलेली नाही. शेतकऱ्यांवर न लादता त्यांना विश्वासात घेऊनच शक्तिपीठ महामार्गाची वाटचाल करणार आहोत. या भूमिकेवर आजही ठाम असून, १५ ऑगस्ट रोजी शेतशिवारात ध्वजारोहण करण्यासाठी आणि खर्डा-भाकर खाण्यासाठी सतेज पाटील यांनी नितीन राऊत यांनाही बोलवायला हवे होते, अशीही कोपरखळी मंत्री मुश्रीफ यांनी लगावली.कदाचित ‘राहुल’, ‘चंद्रदीप’ स्वतंत्र लढतीलविधानसभेच्या २०२९ च्या निवडणुकीत मतदारसंघाची पुनर्रचना होणार असून, यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात तीन मतदारसंघ वाढणार आहेत. कोल्हापूर शहरातील लोकसंख्या तुलनेत अधिक वाढल्याने ‘करवीर’चे विभाजन होऊ शकते. यामध्ये कदाचित राहुल पाटील व चंद्रदीप नरके स्वतंत्र मतदारसंघातून लढू शकतील, असे संकेतही मंत्री मुश्रीफ यांनी दिले.
जाजम, घड्याळ खरेदीबाबत स्पष्टीकरण दिले‘गोकुळ’ने खरेदी केलेल्या जाजम व घड्याळ खरेदीबाबत संघाने यापूर्वीच योग्य तो खुलासा केलेला आहे. संघाच्या निवडणुकीत जी आश्वासने दिली होती, त्यांची पूर्तता करत असताना आतापर्यंतचा सर्वाधिक दूध दर शेतकऱ्यांना दिल्याचे समाधान वाटत असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
कोल्हापूरचा २० टक्के जीडीपी वाढणारसरन्यायाधीश भूषण गवई यांच्या माध्यमातून लवकरच खंडपीठही साकारत आहे. यामुळे कोल्हापुरात विकासाचे महाद्वार उघडले जाणार असून, जिल्ह्याचा २० टक्के जीडीपी वाढणार आहे. त्यामुळे शहराची हद्दवाढ करणे, शेंडा पार्क येथील जागेत इमारत, यासह आयटी पार्क निर्माण करण्याची गरज असल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.