गोकुळच्या निवडणुकीत सुरुवातीपासून टोकाचा संघर्ष आणि दोलायमान स्थितीमुळे सत्ताधारी आणि विरोधी आघाडी यांनी बेरजेचे राजकारण सुरू केले. दोन्ही मंत्र्यांनी "आता नाही तर कधीच नाही !" ही मनाशी खूणगाठ बांधली आणि मोट बांधण्यास सुरुवात केली. सत्ताधारी आघाडीतील विद्यमान संचालकांना आपलेसे करून लढाई जिंकली. भुदरगड तालुक्यात माजी आमदार के. पी. पाटील हे सोबत होते; पण आमदार आबिटकर यांना आपल्या गटाकडे खेचण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पण आमदार आबिटकर यांना आपल्या सोबत घेण्यासाठी सत्ताधारी गटातील ज्येष्ठ नेतेमंडळी प्रयत्न करीत होते. आमदार आबिटकर यांनी दोन जागांची मागणी केली. ही मागणी मान्य करीत पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आमदार आबिटकर यांना आपल्याकडे खेचण्यात यश मिळविले. एप्रिल महिन्यात चार तारखेला आमदार आबिटकर यांनी विरोधी आघाडीला पाठिंबा दिला.
आमदार आबिटकर आणि माजी आमदार के. पी. पाटील हे परस्पर विरोधक असल्याने मतदान फुटीर होणार अशी आवई उठवली जात होती. या दोन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन वाटचाल केल्यामुळे तालुक्यातून राष्ट्रवादीमधून रणजित पाटील, तर आमदार गटातून नंदकुमार ढेंगे आणि राधानगरीमधून अभिजित तायशेट्टी विजयी झाले.
नंदकुमार ढेंगे यांनी एकवेळ राष्ट्रवादी काँग्रेसमधून सभापतिपद भूषविले आहे. श्रीकृष्ण दूध संस्थेच्या स्थापनेपासून त्यांची सहकारातील वाटचाल अतिशय पारदर्शक आणि देदीप्यमान आहे. मृदुभाषी असलेल्या नंदकुमार ढेंगे यांच्या माध्यमातून भुदरगड तालुक्याचा उपतालुका असलेल्या मडीलगे गावाला प्रथमच ‘गोकुळ’चे संचालकपद मिळाले आहे.
फोटो
नंदकुमार ढेंगे