कोल्हापूर : घुणकी (ता. हातकणंगले) येथील वारणा सहकारी दूध संस्थेच्या संचालकांनी १३ लाख ७५ हजार ६०७ रुपये ३६ पैशांचा अपहार केल्याबद्दल सर्व संचालकांसह प्रमाणित लेखापरीक्षक दत्तात्रय शिवाजी मगदूम ( रा.चुये, ता. करवीर) यांच्यावर वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत, प्रथम विशेष लेखापरीक्षक वर्ग-१ सहकारी संस्था (साखर) हृषीकेश कुलकर्णी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.संस्थेचे तत्कालीन सचिव धनाजी अशोक पाटील, तत्कालीन अध्यक्ष आनंदराव सुबराव पाटील, तत्कालीन उपाध्यक्ष बाळकृष्ण दत्तात्रय पाटील, तत्कालीन संचालक संजय दत्तू पाटील, मानसिंग दत्तात्रय पाटील, रावसोा आनंदा कुरणे, हंबीरराव गणपती सनदे, संतोष आत्माराम कांबळे, मालुबाई शामराव चव्हाण, छाया पोपट पाटील (सर्व, घुणकी ता. हातकणंगले) त्याचबरोबर प्रमाणित लेखापरीक्षक मगदूम यांनी संगनमताने आपल्या पदाचा दुरूपयोग करून संस्थेच्या सार्वजनिक निधीचा स्वतच्या फायद्यासाठी अपहार करून संस्थेचे १३ लाख ७५ हजार ६०७ रुपये ३६ पैसे इतक्या रक्कमेचा अपहार केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. संबंधितांनी खोटा ताळेबंद सादर करून अपहार केल्याची तक्रार कुलकर्णी यांनी पाेलिसांत दिली आहे.
असा केला अपहार..
- रुजवातीअंती अमान्य केलेल्या रक्कमेचा अपहार - ८ लाख ४ हजार २६१ रुपये ९५ पैसे
- मृत सभासद थकीत/ येणेबाकी रक्कम दर्शवून केलेल्या रक्कमेचा अपहार - १ लाख ४६ हजार ३२६ रुपये ४२ पैसे
- संस्थेने दिलेल्या पत्यावर राहत नसलेल्या व्यक्तीकडून येणेबाकी दर्शवून केलेला अपहार - ५७ हजार ८५ रुपये ४८ पैसे
- एकूण रक्कमेपैकी रुजवाती न झालेली बाकी रक्कम दर्शवून केलेला अपहार - १ लाख ४४ हजार १८३ रुपये ७३ पैसे
- यादीप्रमाणे संस्था कार्यालयामध्ये नसलेला डेडस्टॉक दाखवून अपहार - ३० हजार ३६७ रुपये ४८ पैसे
- फेर लेखापरीक्षण कालावधीत अवाजवी खर्च करुन केलेेले नुकसान - २६ हजार ४४० रुपये
- येणे सभासद यादी फरक करून केेलेला अपहार - २७ हजार ३४० रुपये ६७ पैसे
- बँक शिल्लक रक्कम ताळेबंदास बोगस दर्शवून केलेला अपहार - २ हजार ४८ रुपये २६ पैसे
- अस्तित्वात नसलेल्या संस्थेत गुंतवणूक दर्शवून केलेला अपहार - १७ हजार ६०० रुपये
- इतर येणे - ५१ हजार ६०० रुपये
- दूध दर फरक वाटप रक्कमेतून केलेला अपहार - ६४ हजार ८०२ रुपये ५५ पैसे
- दूध घट वाढ व व्यापारी पत्रकात दूध खरेदी वाढवून केलेला अपहार - ३ हजार ५५० रुपये ८२ पैसे