कोल्हापूर : उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून आज, सोमवारी (दि.२५) शिवाजी विद्यापीठात ‘उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ कोल्हापूर’ हा उपक्रम होणार आहे. त्यामध्ये मंत्री सामंत विद्यार्थ्यांसह उच्चशिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घटकांचे प्रश्न, अडचणी समजून घेणार आहेत.
विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यापीठीय कर्मचारी, शैक्षणिक संस्थांचे विविधस्तरावरील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्री सामंत यांनी ‘उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय आपल्या विभागात’ हा अभिनव उपक्रम घोषित केला. त्याची सुरुवात विद्यापीठात ‘उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ कोल्हापूर’ने होणार आहे. विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहामध्ये सकाळी ११ ते सायंकाळी ५ यावेळेत होणाऱ्या उपक्रमास उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त, तंत्रशिक्षण संचालनालय, उच्चशिक्षण, कला संचालनालय, तंत्रशिक्षण मंडळ, ग्रंथालय संचालनालयाचे संचालक आदी उपस्थित असतील. दरम्यान, कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरु डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील यांनी या उपक्रमाच्या तयारीची रविवारी पाहणी केली. मंत्रालय, उच्चशिक्षण विभागातील उपसचिव, सहसंचालक हे कोल्हापुरात आले असून, त्यांच्याकडून या उपक्रमाची तयारी दिवसभर सुरू होती.
चौकट
९०० ऑनलाइन निवेदने सादर
या उपक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या घटकांना निवेदने सादर करण्यासाठी विद्यापीठाने ऑनलाइन पोर्टल निर्माण केले आहे. या पोर्टलवर सायंकाळपर्यंत सुमारे ९०० व्यक्ती, संस्थांनी ऑनलाइन निवेदने सादर केली आहेत. त्यात आश्वासित प्रगती योजना, कॅस पदोन्नती, पदभरतीबाबतच्या निवेदनांची संख्या अधिक आहे.
फोटो (२४०१२०२१-कोल- उच्चशिक्षण उपक्रम) : शिवाजी विद्यापीठात आज, सोमवारी होणाऱ्या ‘उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ कोल्हापूर’ हा उपक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे.