कोल्हापूर : झोळी फाटेल इतके भरभरून दिल्याचे शिवसेनेचे नेते म्हणत असले तरी त्यांच्यामुळे नव्हे, तर कागलची जनता व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच मला भरभरून दिले, असा पलटवार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी खासदार संजय मंडलिक यांच्यावर केला. बँक काचेच्या भांड्यासारखी असते, निवडणुकीमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांमुळे ठेवीदारांवर परिणाम होतो, म्हणूनच बिनविरोधचा निर्णय घेताना मी कचरल्याची कबुलीही त्यांनी दिली.
जिल्हा बँक निवडणूक पार्श्वभूमीवर शाहू शेतकरी विकास आघाडीच्या प्रचारार्थ महासैनिक दरबार हॉल येथे आयोजित मेळाव्यात मंत्री हसन मुश्रीफ बोलत होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, तुरंबे येथील मेळाव्यात विरोधी आघाडीच्या नेत्यांनी माझ्यावर टीका केली. खरे तर या निवडणुकीत आपण विरोधकांवर बोलणार नव्हतो, मात्र त्यांनी केलेल्या टीकेला उत्तर द्यावे लागणार आहे. आघाडी सरकारच्या काळात १५ वर्षे आपण मंत्री हाेतो. २०१९ च्या निवडणुकीनंतर राज्यात शिवसेना-भाजपला बहुमत मिळाले, मात्र केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा शब्द न पाळल्याने राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दोन वर्षे मंत्री म्हणून कार्यरत आहे.
माझी झोळी फाटेपर्यंत कागलच्या जनतेने व शरद पवार यांनीच मला दिले. आता फार अपेक्षा नाहीत. बँकेवर नऊ वर्षे प्रशासक होते, त्यानंतर सभासदांनी आमच्यावर जबाबदारी सोपवली. निवडणुकीत पॅनल झाले तर टीका-टिप्पणी, बदनामीकारक वक्तव्याचा बँकेवर परिणाम होईल, म्हणून निर्णय घेण्यास कचरलो. राजकीय पादत्राणे बाहेर ठेवून एकमेव पॅनल व्हावे, यासाठी प्रयत्न केले.
‘शाहू’ बिनविरोधचा सल्ला मंडलिकांचाच
शाहू साखर कारखाना व जिल्हा बँक बिनविरोधबाबत प्रा. संजय मंडलिक बोलत आहेत. मात्र बिनविरोधचा सल्ला त्यांनीच होता आणि बिनविरोध व्हावे, असे पत्रकही त्यांनीच काढल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
आमच्यावर टीका करा, मात्र कारभार चांगला म्हणा
इतर निवडणुकीत टीका-टिप्पणी चालू शकते. येथे ठेवीदारांमध्ये साशंकता निर्माण झाली तर पत्त्यासारखे घर कोसळायला वेळ लागणार नाही. विरोधी पॅनलने आमच्यावर टीका करावी, मात्र बँकेचा कारभार चांगला आहे तरी म्हणा, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.