आजरा : आजरा तालुक्यात मजगी आणि पाणलोटअंतर्गत बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांच्या माध्यमातून शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून या कामांची पाहणी करण्याकरिता पंचायत समिती स्तरावर समिती नेमण्याचा महत्त्वूपर्ण निर्णय आजरा पंचायत समितीच्या मासिक सभेत घेण्यात आला. पाणलोट बंधाऱ्यात एक थेंबही पाणी साठत नसून या बंधाऱ्यामध्ये प्रचंड आर्थिक घोटाळा झाला असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.आजरा पंचायत समितीची मासिक सभा सभापती विष्णूपंत केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी पाणलोट बंधाऱ्यांच्या घोटाळ्याबाबत जोरदार चर्चा झाली. सभापती केसरकर म्हणाले, पाणलोटअंतर्गत तालुक्यात बांधण्यात आलेला एकही सिमेंट व मातीचा बंधारा व्यवस्थित नाही. थेंबभर पाणी बंधाऱ्यात साठत नसेल तर कृषी विभागाने बंधारे बांधून नेमके काय साध्य केले ? सदस्यांनी शांत राहायचे आणि कृषी विभागाने पैसा मनमानी पद्धतीने खर्च करायचा, असा प्रकार सुरू आहे. अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून हप्ते जमा करायचे व कामांच्या नावाने शिमगा असा प्रकार असल्याचा आरोप केला.तालुक्यात मजगीची कामेही बोगस पद्धतीने झाली आहेत. बंधारे दिसू नयेत म्हणून बंधाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर झाडे लावून बंधारे झाकण्याचा प्रयत्न केला गेला असून याची संपूर्ण चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याचा ठरावही करण्यात आला.सभेमध्ये एस. टी. महामंडळाच्यावतीने आजरा तालुक्यातून गाव तेथून पंढरपूरला एस.टी. फेरी असा आषाढी एकादशीनिमित्त उपक्रम राबवण्यात येत असल्याचे आगारप्रमुख के. डी. मुरकुटे यांनी सांगितले.कोवाडे, मलिग्रे मार्गावरील ५० लाख रुपये खर्चाच्या रस्त्यावर महिन्याभरात खड्डे पडले असून या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे सदस्य तुळशीराम कांबळे यांनी सांगितले.आजरा-आंबोली मार्गावर वाहतुकीची होणारी अडचण लक्षात घेऊन पर्यायी रस्त्याचा प्रस्ताव या रस्त्यासाठी लागणाऱ्या जागेच्या नुकसानभरपाईसह पाठवण्यात आला असल्याचे कार्यकारी अभियंता नवरवंडकर यांनी सांगितले. कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन आराखड्यात समावेशासाठी खेतोबाची राई, रामतीर्थ व चाळोबा या ठिकाणांसाठी प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे परिक्षेत्र वनअधिकारी राजन देसाई यांनी सांगितले. वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानभरपाईत दुप्पटीने वाढ करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. बैठकीमध्ये पशुधन विभाग, आरोग्य विभाग, पंचायत विभाग, पंचायत कृषी विभाग, महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग आदी विभागांची माहिती घेण्यात आली.यावेळी सर्व सदस्य, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. स्वागत सहायक गटविकास अधिकारी एस. एस. भोसले यांनी केले. गटविकास अधिकारी ए. डी. कांबळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)हे सिनेमाचे थिएटर नव्हेपंचायत समिती सभेला बहुतांशी अधिकारी सभा सुरू झाल्यावर येत राहतात. आजच्या सभेतही हाच प्रकार अनुभवास आल्याने संतप्त सभापती विष्णूपंत केसरकर यांनी संबंधितांना हे सिनेमाचे थिएटर नाही. वेळेत हजर राहायचे, अशा शब्दांत सुनावले.
'पाणलोट'मध्ये कोट्यवधीचा घोटाळा
By admin | Updated: July 17, 2015 00:04 IST