कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पुरोगामी चळवळीत सक्रिय असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते अशीच दादासाहेब जगताप यांची ओळख आहे. बहुजन समाज जातीपातीच्या उतरंडीमधून बाहेर पडून त्याने फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा जोपासली पाहिजे, यासाठी ते आयुष्यभर प्रयत्न करत राहिले आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनापासून ते अनेक चळवळींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापुरात व्हायला हवे, यासाठी धडपड करणारी ती व्यक्ती आहे. त्यांनी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या पुण्यतिथीदिवशी २ जानेवारी १९६९ला ‘बहुजन समाज’ साप्ताहिकाचे प्रकाशन केले व या साप्ताहिकाचे सतत १९ वर्षे संस्थापक संपादक म्हणून काम केले. या साप्ताहिकात भाई माधवराव बागल; तत्कालीन मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश पी. बी. सावंत, बापूसाहेब घोरपडे, वीर उत्तमराव मोहिते, प्रा. मा. म. देशमुख व भाई केशवराव घोंगडे यांनी लेखन केले. या साप्ताहिकात ‘गोडसे : हुतात्मा की भुुतात्मा’ ही ३२ लेखांची लेखमालिका पी. बी. पोवार यांनी प्रसिद्ध केली. त्यावेळी महाराष्ट्रात फार मोठी खळबळ उडाली होती.
बहुजन समाजाला जागे करण्यासाठी महात्मा जोतीराव फुले यांच्या (२७ नोव्हेंबर १९७०) पुण्यतिथीला ‘फुले, शाहू, आंबेडकर विचार मंच’ची स्थापना केली. संघटनेच्या अध्यक्षपदी जगताप यांची निवड झाली व ज्येष्ठ पत्रकार शांताराम बोकील यांची उपाध्यक्ष, चिटणीस म्हणून माजी महापौर भिकशेठ पाटील यांची निवड झाली होती.. या विचार मंच संघटनेतर्फे बहुजन समाज विचार जागरण सुरू झाले. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात जगताप यांना दोन महिने शिक्षा झाली. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगच्या गव्हर्निंग कौन्सिल कार्यकारिणीवर त्यांची संचालक म्हणून निवड झाली. त्यावेळी प्रिन्स शिवाजी बोर्डिंग संस्थेत न्यू कॉलेजची स्थापना करावी म्हणून जगताप यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक शंकरराव नलवडे यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न केले. कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठ स्थापन करावे म्हणून जगताप व भाई शामराव माळी यांनी सायकलवरून फिरून प्रमुख नागरिकांच्या सह्या घेतल्या. नगरपालिकेच्या सभागृहामध्ये सभा बोलावून ठराव पास केला आणि शिक्षणतज्ज्ञ सी. रा. तावडे, आमदार पी. बी. साळोखे, ‘पुढारी’चे संपादक ग. गो. जाधव, नगराध्यक्ष बी. बी. पाटील आदींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारला निवेदन दिले. त्यानंतर शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली. मुंबई शहरातील क्रॉफर्ड मार्केटला महात्मा जोतीराव फुले यांचे नाव देण्यातही त्यांचा वाटा होता. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचा कोल्हापुरात मध्यवर्ती बसस्थानकासमोरील पुतळा व्हावा, यासाठीही त्यांनी प्रयत्न केले.
महापालिका व्हावी यासाठी...
सीमाभाग महाराष्ट्राला मिळावा म्हणून त्यांनी सत्याग्रहात भाग घेऊन चळवळ केली. कोल्हापूर शहरात नगरपालिका होती. कोल्हापूर शहर मोठे शहर असताना महानगरपालिका नाही, यासाठी जगताप व भाई दिनकरराव पाटील यांनी महानगरपालिका करावी म्हणून त्यावेळचे नगराध्यक्ष वसंतराव निगडे यांच्यामार्फत प्रयत्न केले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काँग्रेसचे काम निष्ठेने केले. ही पक्षीय बांधिलकी त्यांनी आजही जपली आहे.
फोटो : २९०४२०२१-कोल-दादासाहेब जगताप-वाढदिवस