कोल्हापूर : खंडपीठप्रश्नी चर्चा करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींसोबत खंडपीठ कृती समितीची शुक्रवारी (दि. २८) मुंबईत बैठक होणार आहे. सुमारे तीन वर्षांनंतर प्रथमच अशी बैठक होणार असल्याने कोल्हापूर खंडपीठासाठी सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष सर्जेराव खोत यांनी व्यक्त केला. खंडपीठाचा प्रश्न निकाली निघावा, यासाठी ४ एप्रिलपासून पंढरपूरच्या विठ्ठलाला साकडे घालून पंढरपूर ते कोल्हापूर रथयात्रा सुरू होणार असल्याची माहिती ॲड. खोत यांनी मंगळवारी (दि. २५) पत्रकार परिषदेत दिली.कोल्हापूर खंडपीठाबाबत चर्चा करण्यासाठी वेळ द्यावी, अशी मागणी जिल्हा बार असोसिएशनने उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्य यांनी शुक्रवारी सायंकाळी बैठकीसाठी वेळ दिल्याचे पत्र जिल्हा बार असोसिएशनला मिळाले आहे.
या बैठकीसाठी मुख्य न्यायमूर्तींसह प्रशासकीय न्यायमूर्तींचे पॅनेल उपस्थित राहणार आहे. खंडपीठ कृती समितीचे पदाधिकारी, सहा जिल्ह्यांतील बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि काही ज्येष्ठ वकील उपस्थित असतील.