कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या बहुचर्चित हद्दवाढीसंदर्भात सोमवारी (दि. २४ मार्च) दुपारी दोन वाजता उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विधान भवनात बैठक होत आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मागणीनुसार शिंदे यांनी ही बैठक बोलाविली आहे. या बैठकीचे कृती समिती पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही.कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढ व प्राधिकरणासंदर्भात गेल्या दोन-तीन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. याची दखल घेऊन पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार विनय कोरे, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका प्रशासक यांच्या समवेत तातडीने बैठक आयोजित करावी, अशा मागणीचे पत्र क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना दिले होते.
बैठकीत हद्दवाढ व प्राधिकरणासंदर्भात चर्चा होईल, तसेच पन्हाळा गिरीस्थान नगर परिषद येथील ऐतिहासिक शिवतीर्थ तलावातील शिवस्मारकाचे सुशोभीकरण, बगिचा व पदपथ विकसित करण्याबाबत आढावा घेतला जाणार आहे.