याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी (दि. १४) सकाळी अकराच्या सुमारास या विवाहितेच्या घरातील पती व सासू वेडसर सासरा व लहान मुलांच्या कडे लक्ष ठेवण्यासाठी या विवाहितेस घरी ठेवून आपण जनावरे चारायला गेले होते. दरम्यानच्या काळात घरात कोणी नसल्याचे पाहून या विवाहितेने पाठीमागील गोठ्याच्या छताच्या वाशाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास लहान मुलांना आईची आठवण झाल्याने त्यांनी शोधाशोध केली असता ही घटना उघडकीस आली. आई निपचित होऊन फासावर लटकत असल्याचे पाहून लहान मुलांनी हंबरडा फोडला. त्यामुळे शेजाऱ्यांनी धाव घेतली असता ही महिला मृत झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस पाटील व राधानगरी पोलिसांना कळविले. रात्री उशिरा पोलिस पंचनामा व शवविच्छेदन होऊन रविवारी पहाटे महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी या विवाहितेच्या लहानग्यांनी व नातेवाइकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. आत्महत्येचे नेमके कारण समजलेले नाही. राधानगरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
मलगुंडे वाडा येथे विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:29 IST