लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत सोमवारी कोथिंबीर व शेपूची आवक वाढल्याने मातीमाेल दराने विक्री करावी लागली. कोथिंबीरची विक्रीच न झाल्याने शेतकरी तिथेच टाकून गेल्याने समिती आवारात ढीग पडून राहिले होते. त्यामुळे शेवटी ट्रॅक्टरमध्ये भरून ते कचरा कोंडाळ्यात टाकण्याची वेळ आली आहे. आवक वाढल्याबरोबरच पावसाचाही परिणाम झाला आहे.
गौरी पूजनासाठी घरोघरी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखविला जातो. त्यामुळे पालेभाज्यांची मागणी अधिक असते. त्यातही शेपू भाजीला अधिक पसंत असते. त्यामुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोल्हापूर बाजार समितीत कोथिंबीरसह पालेभाज्यांची आवक वाढली आहे. सोमवारी बाजार समितीत ४६ हजार ७५० पेंढ्या कोथिंबीरची, तर ६५०० पेंढ्या शेपूची आवक झाली होती. आवक अधिक आणि मागणी कमी झाल्याने दर कोसळले. घाऊक बाजारात कोथिंबीरची पेंढी दोन रुपये, तर शेपूची तीन रुपये पेंढी दर राहिला. एवढ्या दरानेही कोणी खरेदी न केल्याने कोथिंबीर व शेपूच्या भाजीचे ढीग समितीत लागले होते. शेवटी समिती प्रशासनाला ट्रॅक्टरमध्ये भरून कचरा कोंड्याळ्यात टाकावी लागली.
शेतकरी हवालदिल..
कोथिंबीर व शेपू भाजीचा उत्पादन खर्च सोडाच किमान वाहतुकीचा खर्च तरी मिळेल का? याबाबत शेतकऱ्यांच्या मनात शंका आहे. त्यामुळे बाजारात आणण्यापेक्षा भाजी जनावरांना घालावी लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
कोट-
कोथिंबीरसह शेपूची आवक मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यात पावसामुळे उठाव झाला नसल्याने माल शिल्लक राहिला होता.
- जयवंत पाटील (सचिव, बाजार समिती)
फोटो ओळी : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी कोथिंबीरची आवक वाढल्याने विक्री झाली नाही. त्यामुळे ट्रॅक्टरमध्ये भरुन कोथिंबीर कचरा कोंडाळ्यात टाकावी लागली. (फोटो-१३०९२०२१-कोल-बाजार समिती)