कुरुंदवाड : विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करून त्रास देत माहेरी सोडून नांदविणेस नेणार नाही, अशी धमकी दिल्याप्रकरणी सासरे सांगलीचे माजी नगरसेवक अशोक कृष्णा फावडे यांच्यासह चौघाजणांविरुद्ध येथील पोलिसांत हुंडाबळी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद विवाहिता गायत्री रोहन फावडे (रा. रिसाला रोड, सांगली, सध्या रा. कुरुंदवाड) हिने दिली आहे.
या प्रकरणी पती रोहन अशोक फावडे, सासू शुभांगी अशोक फावडे व जाऊ गीतांजली प्रकाश फावडे (सर्व रा. रिसाला रोड, सांगली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गायत्री फावडे यांचा २०१७ साली रोहन फावडे याच्याशी विवाह झाला होता. विवाहिता ही सासरी नांदत असताना वरील संशयित चौघांनी विनाकारण मानसिक, शारीरिक छळ करून २०१८ सालापर्यंत जाचहाट केला होता व माहेरी सोडून नांदविण्यास नेणार नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास साहाय्यक फौजदार राजेंद्र उगलमुगले करीत आहेत.