कोल्हापूर : बार्टी, सारथी, टीआरटीआय, महाज्योती, आर्टी या संशोधन व प्रशिक्षण संस्थांतर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा आणि कौशल्य आधारित प्रशिक्षण कार्यक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी (सामाईक प्रवेश परीक्षा) घेण्यात येते. मात्र, पर्यायच उपलब्ध नसल्याने ‘महाज्योती’ने आयोजित केलेल्या सीईटी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज सादर करणाऱ्या धनगर समाजातील अनेक विद्यार्थ्यांना मुकावे लागणार आहे.इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या ‘महाज्योती’ या संस्थेकडून जेईई, नीट, एमएचटी-सीईटी २०२५-२७ परीक्षा पूर्व ऑनलाइन प्रशिक्षण राबवण्यात येत आहे. यासाठी अर्ज सादर करताना पोटजातीचा पर्याय द्यावा लागतो. धनगर समाजातील बंडगर, सनगर, अहीर, खुटेकर अशा एकूण २९ पोटजाती आहेत. मात्र, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भटक्या जमाती-क प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्रावर ‘हिंदू धनगर’ असा उल्लेख आहे. त्यांना अर्ज सादर करताना ‘भटक्या जमाती-क’ प्रवर्गासमोर पोटजातीचा पर्याय द्यावा लागतो. या सीईटी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज सादर करणाऱ्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना अर्जामध्ये पोटजातीच्या पर्यायात ‘हिंदू धनगर’ हा पर्यायच दिलेला नाही. ‘भटक्या जमाती-क’ प्रवर्गात ‘धनगर’ ही पोटजात येत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज बाद ठरण्याची भीती आहे. यासंदर्भात ओबीसी संघटनेने विभागाचे मंत्री अतुल सावे यांना निवेदन दिले आहे. यासंदर्भात ‘महाज्योती’च्या संकेतस्थळावर सुधारणा करावी आणि परीक्षा अर्ज सादर करण्यास मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.दरम्यान, या परीक्षेस इच्छुक विद्यार्थ्यांना ११ वी विज्ञान शाखेत प्रवेश घेण्यासाठी प्रक्रिया सुरू होण्यास विलंब होत असल्याने या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास मुदतवाढ करावी, अशी विनंती महाज्योतीला केलेली आहे, त्यामुळे अर्ज करण्यास आणि अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना अर्जासह दुरुस्ती करण्यास १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.
धनगर समाजातील अनेक विद्यार्थी ‘महाज्योती’च्या ‘सीईटी’ला मुकणार, कारण काय.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 13:48 IST