कोल्हापूर : जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने रोजच्या पेट्राेल दरवाढीविरोधात एकदाच शंभर रुपये प्रतिलिटर दर पार करा . याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे एका संकेतस्थळावर ऑनलाइन उपहासात्मक याचिका दाखल केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोलचे दर नर्व्हस नाईन्टी अर्थात नव्वद रुपयांच्या आतबाहेर असा होत आहे. ही वाढ सर्वसामान्यांच्या खिशाला परवडत नाही. त्यामुळे दरवाढ कमी करावी. त्याकरिता उपहासात्मकरीत्या एकदाचे पेट्रोल १०० रुपये प्रतिलिटर करावे. ही घोषणा उद्या, मंगळवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून करावी. अशी मागणी या उपहासात्मक ऑनलाइन याचिकेमध्ये केली आहे. अशा प्रकारचे आंदोलन प्रथमच कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसतर्फे होत आहे. जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष दीपक थोरात व अभिषेक मिठारी यांनी ही याचिका आवाज इंडिया नावाच्या पोर्टलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे दाखल केली आहे. हे पोर्टल अशा प्रकारच्या ऑनलाइन उपहासात्मक याचिकांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे या पोर्टलवर ही कैफियत अपलोड करीत अनोखे आंदोलन केल्याची माहिती मिठारी यांनी दिली.