कोल्हापूर : रासायनिक संवर्धनादरम्यान अंबाबाई मूर्तीवरील गायब करण्यात आलेला नाग पुन्हा घडवून देवीचे मूळ स्वरूप अबाधित राखले जावे. मूर्तीवर एमसील लावून तिची विटंबना करून भाविकांच्या भावनांशी खेळणाऱ्या पुजाऱ्यांवर कारवाई व्हावी, देवीचे नाव ‘अंबाबाई’ असून कोल्हापुरात सर्वत्र या देवीचा ‘अंबाबाई’ असाच नामोल्लेख ठेवला जावा, अशा मागण्यांचे निवेदन मंगळवारी करवीरनिवासिनी अंबाबाई भक्त समितीच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत यांच्यासह मान्यवरांनी मूर्तीसंबंधीची माहिती सांगितली. निवेदनात, मूर्तीच्या मस्तकावर नाग आहे, हे जुन्या छायाचित्रांमध्ये स्पष्ट दिसते. या देवतेच्या वर्णनातही नागाचा उल्लेख आहे. त्यामुळे तो मूर्तीवर पुन्हा घडविण्यात यावा. त्यासाठी सोन्या-चांदीच्या नाग चिन्हांचा वापर करू नये. मूर्तीचे वाहन असलेले सिंहाचे शिल्पही व्यवस्थित घडविण्यात यावे. हे देवस्थान अतिप्राचीन असून अन्य देवस्थानांच्या तुलनेत याची आर्थिक स्थिती समाधानकारक नाही. कारण येथील संपत्तीचा ताबा पुजाऱ्यांकडे आहे. त्यामुळे गाभाऱ्यात अर्पण होणारी दक्षिणा देवस्थान समितीने स्वत:कडे घ्यावी. जिल्हाधिकाऱ्यांनी नागप्रतीक महत्त्वाचे असून त्यावर निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. तसेच मूर्तीवर एमसील लावणाऱ्या दोषींवर कारवाई केली जाईल, असे सांगितले. यावेळी अशोत सुतार, बबनराव रानगे, विकास जाधव, राजू परांडेकर, बाळासो सासने, किशोर चव्हाण, शंकरराव शेळके, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘अंबाबाई’संदर्भात पुरावे सादर कराशिष्टमंडळाने या देवीचे मूळ स्वरूप ‘अंबाबाई’ असून ‘महालक्ष्मी’ ऐवजी ‘अंबाबाई’ हा नामोल्लेख सर्वत्र केला जावा, अशी मागणी केली. त्यावर डॉ. सैनी म्हणाले, ‘हा मुद्दा शैव आणि वैष्णव या वादांचा असल्याने तो गंभीर आहे. त्यात शासन निर्णयच योग्य ठरणार आहे. त्यामुळे ‘अंबाबाई’ या स्वरूपासंदर्भातील सर्व पुरावे शासनदरबारी सादर करून ‘अंबाबाई’ या नामोल्लेखाची मागणी करावी. तसेच मूर्तीच्या इतिहास संशोधनासाठी समितीची नेमणूक करता येईल.’ पुरातत्त्व खाते म्हणते...जिल्हाधिकारी म्हणाले, मूर्तीवर नागप्रतीक का घडविले नाही, याबाबतचा अहवाल पुरातत्त्व खात्याकडून मागविण्यात आला आहे. त्यात ‘आम्ही मूर्तीचे केवळ संवर्धन केले आहे. नव्याने कोणत्याही गोष्टी घडविलेल्या नाहीत. संवर्धन करताना आम्हाला नागप्रतीक दिसले नाही; त्यामुळे आम्ही ते घडविलेले नाही; पण गरज असेल तर ते घडवून दिले जाईल,’ असे स्पष्ट केले आहे. मात्र, या प्रकरणात मी कोर्टकचेरी होऊ देणार नाही. त्यामुळे पुरातत्त्व खाते, देवस्थान आणि श्रीपूजक यांच्याशी चर्चा करून यावर निर्णय घेतला जाईल.
अंबाबाईचे मूळ स्वरूप कायम ठेवा
By admin | Updated: August 26, 2015 00:10 IST