कोल्हापूर : सन २०१० ते २०१५ अशा पाच वर्षांत अनुक्रमे अनुसूचित जाती व खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद आरक्षित राहिल्यानंतर आता आॅक्टोबर २०१५ ते एप्रिल २०१८ या अडीच वर्षांत इतर मागास (ओबीसी) प्रवर्गातील महिलेला महापौर होण्याचा मान मिळणार आहे. त्यामुळे महापालिकेत महापौर होण्याची मक्तेदारी महिलांनी कायम राखली. आज, शनिवारी मंत्रालयात महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली, त्यामध्ये कोल्हापूरचे महापौरपद हे इतर मागास प्रवर्गातील महिलेकरिता आरक्षित राहिले.आॅक्टोबर २०१०मध्ये कोल्हापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाली. त्यानंतर पहिली अडीच वर्षे महापौरपद हे अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाले. त्यामुळे वंदना बुचडे, कादंबरी कवाळे व जयश्री सोनवणे यांना महापौर होण्याचा मान मिळाला. त्यानंतरची अडीच वर्षे महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित राहिले. त्यामुळे प्रतिभा नाईकनवरे, सुनीता राऊत यांच्यासह आता तृप्ती माळवी यांना महापौर होता आले. विद्यमान सभागृहाची मुदत आॅक्टोबर २०१५ पर्यंत आहे. त्यानंतर निवडणूक होऊन नवीन सभागृह अस्तित्वात येणार आहे. नव्या सभागृहाच्या पहिल्या महापौर या ओबीसी प्रवर्गातील महिला होणार आहेत. महापालिकेच्या राजकारणात नंबर एकवर राहण्याची मक्तेदारी महिलांनी आजच्या आरक्षण सोडतीतही कायम ठेवली. नवीन सभागृहातील पुरुष नगरसेवकांना पहिली अडीच वर्षे महापौरपदासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)
कोल्हापूर महापालिकेवर पुन्हा महिलाराज
By admin | Updated: August 17, 2014 00:53 IST