शंभो.. शंकरा'च्या गजरात कोल्हापुरात महाशिवरात्री साजरी

By संदीप आडनाईक | Published: March 8, 2024 04:17 PM2024-03-08T16:17:15+5:302024-03-08T16:17:15+5:30

अंबाबाई मंदिरातील मातृलिंग भाविकांच्या दर्शनाखाली खुले 

Mahashivratri was celebrated in Kolhapur with auspicious and religious activities | शंभो.. शंकरा'च्या गजरात कोल्हापुरात महाशिवरात्री साजरी

शंभो.. शंकरा'च्या गजरात कोल्हापुरात महाशिवरात्री साजरी

कोल्हापूर : शिवशंकराची स्तुतीस्तोत्र, ओम नम:शिवायचा जप, रुद्राभिषेक, महारुद्राभिषेक बेल, फूल, धूप, आरती, पालखी सोहळा, भजन, कीर्तन, प्रवचन, महाप्रसाद अशा मंगलमय आणि धार्मिक उपक्रमांनी शुक्रवारी जिल्ह्यात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावात साजरी करण्यात आली.

महाशिवरात्रीमुळे फुलांच्या बाजारात बेल आणि पांढऱ्या फुलांना चांगलीच मागणी होती. कित्येक मंदिरांमध्ये महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. शेकडो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. शंभो.. शंकरा..च्या गजरात शहरासह जिल्ह्यात महादेवाला रुद्राभिषेक करण्यात आला. या सर्वच मंदिरांत गुरुवारी रात्री विद्युत रोषणाई केली होती.

अंबाबाई मंदिर परिसरातील अतिबलेश्वर, काशी विश्वेश्वर, कपिलतीर्थ आदींसह उत्तरेश्वर, ऋणमुक्तेश्वर, रावणेश्वर, चंद्रेश्वर, वटेश्वर, कैलासगडची स्वारी, लक्षतीर्थ, कोटीतीर्थ सोमेश्वर, बाळेश्वर, निवृत्ती चौकातील ब्रम्हेश्वर आदी शिवमंदिरांची सजावट करुन केळीचे खांब, फुलांच्या माळा व विद्युत रोषणाईने मंदिरे उजळून गेली होती. मंगळवार पेठेतील ‘कैलासगडची स्वारी’ मंदिरात पहाटे महाअभिषेक करण्यात आला, तसेच एस. टी. स्टँड चौकातील वटेश्वर मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.

वर्षातून एकदाच होते मातृलिंगाचे दर्शन

अंबाबाई मंदिरातील मातृलिंग भाविकांच्या दर्शनाखाली खुले केले होते. वर्षातून काही महत्त्वाच्या दिवशीच उघडण्यात येणाऱ्या या मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

चंद्रेश्वर महादेव मंदिरात पौराणिक देखावा

शिवाजी पेठेतील चंद्रेश्वर गल्लीतील श्री चंद्रमहाल तरुण मंडळाने चंद्रेश्वर महादेव मंदिरात भगवान शंकर आणि प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामेश्वरम मंदिराचा पौराणिक देखावा उभारला आहे. अजय काटाळे, रोशन जोशी, सत्यजित मोहिते यांनी ही पूजा बांधली आहे.

ऋणमुक्तेश्वर मंदिरात पालखी सोहळा

शुक्रवार पेठ गंगावेस परिसरातील ऋणमुक्तेश्वर मंदिर व तालीम मंडळामार्फत यंदाही महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. मंदिरात राम आणि सीता महादेवाची पूजा बांधली आहे. शुक्रवारी सकाळी ६:३० वाजता श्री मूर्तीची ॲड.अद्वैत गुलाबराव घोरपडे (सरकार) यांच्या हस्ते महाअभिषेक आणि महापूजा झाली. सायंकाळी ६:३० वाजता पारंपरिक करवीर गर्जना ढोलताशा पथक, महिलांचे लेझीम पथक, भजनी मंडळ व भक्तांच्या उपस्थितीत भव्य पालखी निघाली. या सोहळ्याला संभाजीराजे छत्रपती, राजेश क्षीरसागर, आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, कृष्णराज महाडिक, दौलत देसाई उपस्थित होते.

उत्तरेश्वरात यात्रा

कोल्हापुरातील सर्वांत मोठे शिवलिंग असलेल्या उत्तरेश्वर मंदिरात पहाटे अभिषेक करण्यात आला. या महादेव मंदिर आवारात महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी यात्रा भरते. यंदाही पूजेचे साहित्य, खेळणी, खाद्यपदार्थांच्या गाड्या आणि भाविकांच्या गर्दीने परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

रावणेश्वर मंदिरात गर्दी

रावणेश्वर मंदिरात सकाळी सात वाजल्यापासूनच भाविकांच्या गर्दीत लघुरुद्राभिषेक झाला. त्यानंतर सकाळी नऊ वाजल्यापासून अभंगवाणी, भक्तिगीतांचा कार्यक्रम, महिला भजनी मंडळाचा अभंगवाणी, भावगीते तसेच भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला. सायंकाळी झालेल्या यामपूजेला शिवमहिम्न स्तोत्र अभिषेक, रुद्राभिषेक आणि भस्मारती, मध्यरात्री शिवमहिम्न स्तोत्र अभिषेक व बिल्वार्चन पूजा झाली तसेच जागरण करण्यात आले.

Web Title: Mahashivratri was celebrated in Kolhapur with auspicious and religious activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.