कोल्हापूर : ‘स्वाइन फ्लू’चा फैलाव होण्यासाठी सध्या पोषक वातावरण झाल्याने जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. बुधवारी तीनजणांचा स्वाइन चाचणीचा अहवाल ‘होकारार्थी’ आला. जानेवारीपासून १७४ ‘स्वाइन’चे संशयित रुग्ण छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल झाल्याची नोंद आहे. त्यापैकी १८ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. नागरिकांनी दक्षता घेण्याचे व प्राथमिक लक्षणे आढळताच डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या पंधरा दिवसांत कोल्हापूर जिल्ह्यातील आठजणांच्या स्वाइन चाचणीचा अहवाल ‘होकारार्थी’ आला आहे, तर आठवडाभरात गगनबावडा येथील तुकाराम पडवळ, हातकणंगले येथील लक्ष्मी देवाप्पा पाटील, पिराचीवाडी येथील शिवाजी बाळू डावरे या तिघांचा बळी स्वाइन फ्लूने घेतला आहे. सध्या वातावरणही स्वाइनला पोषक असेच आहे. साधी सर्दी, खोकला, ताप आणि अंग दुखत असल्यास त्याकडे नागरिकांनी दुर्लक्ष करू नये, असा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे. या किरकोळ वाटणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास कदाचित जीवही जाऊ शकतो. त्यामुळे दक्षता म्हणून तज्ज्ञ डॉक्टरांकडे अथवा छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या स्वाइन कक्षाशी संपर्क साधून उपचार घ्यावेत, असे आवाहन स्वाइन कक्षातील अधिकाऱ्यांनी केले आहे. १८ जणांचा मृत्यू जानेवारीपासून १७४ ‘स्वाइन’ रुग्णांवर उपचार १८ जणांचा आतापर्यंत उपचारादरम्यान मृत्यू
‘स्वाइन’चे वारे जोरात
By admin | Updated: August 19, 2015 23:20 IST