हे प्रभू, जगाला कोरोनामुक्त कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:18 AM2020-12-26T04:18:45+5:302020-12-26T04:18:45+5:30
कोल्हापूर : ‘हे प्रभू, जगाला कोरोनामुक्त कर, सर्वांचे आरोग्य चांगले ठेव,’ अशी प्रार्थना (उपासना) कोल्हापुरात शुक्रवारी ख्रिस्ती बांधवांनी केली. ...
कोल्हापूर : ‘हे प्रभू, जगाला कोरोनामुक्त कर, सर्वांचे आरोग्य चांगले ठेव,’ अशी प्रार्थना (उपासना) कोल्हापुरात शुक्रवारी ख्रिस्ती बांधवांनी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी साधेपणाने नाताळ सण साजरा केला. त्यांनी प्रभू येशूंच्या जन्मदिनानिमित्त वायल्डर मेमोरिअलसह अन्य चर्चमध्ये सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत विविध सत्रांमध्ये प्रार्थना केली. लहान मुले, वृद्धांनी घरातूनच प्रार्थना करीत नाताळचे स्वागत केले. नवीन कपडे परिधान करून प्रार्थनेसाठी चर्चमध्ये आलेल्या ख्रिस्ती बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
शहरातील वायल्डर मेमोरिअल चर्च, ख्राईस्ट चर्च, सेंट फ्रान्सिस झेव्हिअर्स चर्च, होली इव्हॅँजलिस्टस चर्च, ऑल सेंट्स चर्च, विक्रमनगर ख्रिस्ती समाज ख्रिश्चन चर्च, होली क्रॉस, सेवंथ डे, आदींसह जिल्ह्यातील विविध चर्चमध्ये विशेष प्रार्थनांचे आयोजन केले होते. थर्मल गनने तपासून मास्क असल्याचे पाहून भाविकांना चर्चमध्ये प्रवेश देण्यात आला. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी एका बेंचवर अंतर ठेवून दोघांची बैठक व्यवस्था केली होती. दरवर्षी प्रार्थनेचे तीन टप्पे होतात. यावेळी सहा ते सात टप्पे करण्यात आले. हे प्रभू, देशाची एकता, अखंडता कायम राहो व जगात शांतता नांदो. जगावरील कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे, अशी प्रार्थना ख्रिस्ती बांधवांनी केली. न्यू शाहूपुरी येथील वायल्डर मेमोरिअल चर्चमध्ये रेव्हरंड डी. बी. समुद्रे, जे. ए. हिरवे, अशोक गायकवाड, सिनोय काळे यांनी नाताळचा संदेश दिला. या ठिकाणी आमदार चंद्रकांत जाधव, नगरसेवक रत्नेश शिरोळकर यांनी भेट देऊन उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. यावेळी चर्च कमिटीचे आनंद म्हाळुंगेकर, संजय थोरात, विनय चोपडे, अतुल रुकडीकर, संदीप थोरात, सचिन समुद्रे, आदी उपस्थित होते. नाताळनिमित्त पुढील आठवडाभर विविध कार्यक्रम होणार आहेत.
चौकट
सेल्फी, शुभेच्छा
काही चर्च आणि ख्रिस्ती बांधवांच्या घरी, वसाहतींमध्ये ‘येशू जन्म’ हा देखावा करण्यात आला. ख्रिसमस ट्रीसह आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. विविध चर्चमध्ये सकाळपासूनच ख्रिस्ती बांधवांनी गर्दी केली. त्यांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करीत प्रार्थना केली, एकमेकांना शुभेच्छा दिल्या. युवक-युवतींनी आपापल्या कुटुंबीय, मित्रमैत्रिणींसमवेत चर्च परिसरात सेल्फी घेत आनंद व्यक्त केला.