कोल्हापूर : दहावी आणि बारावीच्या परीक्षेकडे केवळ ‘कॉलेज लाईफ’पूर्वीचा एक टप्पा म्हणून न पाहता ‘नॉलेज लाईफ’मधील मूलभूत पायरी या दृष्टीने पाहा़ एकाच अभ्यासपद्धतीचा अवलंब करा. भविष्यातील विविध स्पर्धा परीक्षेसाठी ही पद्धत उपयुक्त ठरेल़ सराव प्रश्नपत्रिकांवर भर द्या, असा कानमंत्र चाटे शिक्षण समूहाचे विभागीय संचालक भारत खराटे यांनी विद्यार्थी व पालकांना दिला़ ‘लोकमत’ बाल विकास मंच आणि चाटे शिक्षण समूहातर्फे राजारामपुरी येथील आप्पाज कॉम्प्लेक्स येथे आज, रविवारी आयोजित करण्यात आलेल्या शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते़ दहावी बोर्ड परीक्षेच्या अंतिम टप्प्यातील तयारी व भविष्यातील विविध स्पर्धा परीक्षा आणि संधी हा मार्गदर्शनाचा विषय होता़ खराटे म्हणाले, दहावीच्या परीक्षेतील अंतिम टप्प्यात तयारी करताना हाती असलेले दोन महिने कौशल्यपूर्वक वापरले पाहिजेत़ ऐनवेळी अभ्यासपद्धती न बदलता सुरुवातीपासून ज्या पद्धतीचा अवलंब केला आहे, तीच पद्धत अंतिम टप्प्यातही वापरली पाहिजे़ प्रश्नपत्रिकांचा सराव हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे़ या सरावामुळे काळ, काम आणि वेग याचे अचूक आकलन होईल़ परीक्षेचे वेळापत्रक, आरोग्य, शिक्षकांकडून पाल्याच्या प्रश्नपत्रिका सोडवून घेणे, याबाबत पालकांनी आपला वेळ दिला पाहिजे़ चाटे शिक्षण समूहाच्या विविध उपक्रमांबाबत बोलताना खराटे म्हणाले, चाटे शिक्षणसमूहांतर्गत ज्युनिअर कॉलेज आॅफ सायन्स, हायस्कूल, प्ले गु्रप व नर्सरी या शैक्षणिक सुविधांबरोबरच मेडिकल, जेईई मुख्य आणि आयआयटी - जेईई (अॅडव्हान्स), आदी परीक्षांची तयारीही करून घेतली जाते़ चाटे ज्युनिअर कॉलेज आॅफ सायन्सचे प्राचार्य प्रशांत देसाई यांनी, दहावीमध्येच विद्यार्थ्यांनी विविध विषयांचे कंटेंट क्लीअर करून घेतल्यास जेईई, एआयपीएमटी व आयआयटीसाठी फायदा होईल, असे मत व्यक्त केले़यावेळी चाटे शिक्षण समूहाच्या कोल्हापूर विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस़ जे़ पाटील, कोल्हापूर विभागाचे प्रमुख प्रा़ सर्जेराव राऊत, शाहूपुरी शाखा व्यवस्थापक प्रा़ एल़ डी़ थोरात, पालक प्रतिनिधी राजेश शिंदे, तसेच ‘लोकमत’चे इव्हेंट प्रमुख दीपक मनाठकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले़ दुसऱ्या सत्रात प्रा़ सर्जेराव राऊत यांनी ‘दहावीच्या शिक्षणाकडे झेपावताना’ या विषयावर मार्गदर्शन करताना, सातवी ते नववी ही शैक्षणिक वर्षे स्पर्धा परीक्षेचा पाया तयार करण्यासाठी उपयुक्त आहेत, असे मत व्यक्त केले़ यावेळी पालक प्रतिनिधी म्हणून सीमा कदम उपस्थित होत्या. प्रा. प्रज्ञा गिरी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
दहावी-बारावीकडे ‘नॉलेज लाईफ’च्या दृष्टीने पाहा
By admin | Updated: December 22, 2014 00:15 IST