Lok Sabha Election 2019 राजू शेट्टी विजयाची हॅट्ट्रिक करणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:13 AM2019-04-20T00:13:43+5:302019-04-20T00:14:02+5:30

विश्वास पाटील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार व खासदार राजू शेट्टी यांची लोकसभेला विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी दमछाक होण्याची ...

Lok Sabha Election 2019 Will Raju Shetty make a hat-trick of victory? | Lok Sabha Election 2019 राजू शेट्टी विजयाची हॅट्ट्रिक करणार का?

Lok Sabha Election 2019 राजू शेट्टी विजयाची हॅट्ट्रिक करणार का?

googlenewsNext

विश्वास पाटील
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार व खासदार राजू शेट्टी यांची लोकसभेला विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी दमछाक होण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी त्यांना आव्हान दिले आहे. ‘वंचित बहुजन आघाडी’ने अस्लम सय्यद यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात दलित व मुस्लीम मतांचेही चांगले प्रमाण आहे. ही मते सय्यद यांनी घेतल्यास शेट्टी यांच्यापुढील अडचणी वाढतील. सुरवातीला एकतर्फी वाटणारी ही लढत अंतिम टप्प्यात चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.
शेट्टी यांची आतापर्यंतची ही पाचवी निवडणूक आहे. त्यांच्या मताधिक्याची कमान वाढती आहे. त्यामुळे निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यात ते किती मतांनी निवडून येणार, एवढीच उत्सुकता होती; परंतु आता ही निवडणूक नक्कीच एवढी सोपी राहिलेली नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न मोदी बेदखल करीत असल्याच्या रागातून भाजप आघाडीतून शेट्टी बाहेर पडले व तेव्हापासून ते मोदी यांच्यावर बोचरी टीका करीत आहेत. त्यामुळे भाजपने या मतदारसंघात सर्व पातळ्यांवर तयारी करून शेट्टी यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. इचलकरंजी शहरात पाणीप्रश्नाचे भांडवल करून शेट्टी यांच्याबद्दल नकारात्मक वातावरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ऊस आंदोलनात शेट्टी यांनी कारखानदारांशी उभा दावा मांडला; परंतु ‘आता काँग्रेसच्या आघाडीत जाऊन तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून कसे बसला?’ असा मुद्दा उपस्थित केला जात आहे. गेल्या निवडणुकीप्रमाणे या वेळेलाही मुख्यत: शिरोळ विधानसभा मतदारसंघात काही प्रमाणात जातीय रंग दिला जात आहे. परंतु सामान्य शेतकरी अजूनही शेट्टी यांच्या पाठीशी आहे. माझी बांधिलकी कोणत्या पक्षाशी नव्हे, तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी आहे. त्यासाठीच मी ही निवडणूक लढवत आहे, ही भूमिका घेऊन ते मतदारांसमोर जात आहेत. धैर्यशील माने हे नवीन नेतृत्व आहे. शेट्टी यांच्यावर कोणतीही टीका न करता ते मला संधी द्या, असे आवाहन करीत आहेत.

कळीचे मुद्दे
ऊस, दूध दराची लढाई आणि शेतकºयांच्या हक्कांसाठी खासदारकी पणाला लावली. राजकीय भूमिका बदलली तरी चळवळीच्या बांधीलकीला बट्टा लागू दिलेला नाही.
‘ऊस आंदोलनात ज्यांना तुम्ही चोर म्हटले, त्यांच्याच मांडीवर जाऊन आता का बसला?’ अशी विचारणा शेट्टी यांना होत आहे.


गेली सतरा वर्षे मी लोकांनी दिलेल्या वर्गणीतून ही पाचवी निवडणूक लढवीत आहे. त्यांचा विश्वास हेच माझे मोठे सर्टिफिकेट आहे. ऊस उत्पादक शेतकरी दुध उत्पादकांसह समाजातील सर्वांसाठी मी लढा देत आहे. यामुळे सामान्य जनतेत माझ्याबद्दल विश्वास आहे. हा विश्वासच मला विजयी करील, याची खात्री वाटते.
- राजू शेट्टी, खासदार


विद्यमान खासदारांनी इचलकरंजीतील पाणी प्रश्न वस्त्रोद्योगाचे प्रश्न सोडवण्यासाठी काहीही केले नाही. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत मतदारसंघ विकासात मागे पडला. त्याबद्दल लोकांतून नाराजी आहे. त्यामुळे मला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मतदारांंची ही नाराजीच मला विजयाच्या मार्गावर घेऊन जाईल.
- धैर्यशील माने

Web Title: Lok Sabha Election 2019 Will Raju Shetty make a hat-trick of victory?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.