हसन मुश्रीफ
म्हाकवेः जिल्हा स्तरावरून थकलेले आशांचे मानधन तत्काळ वर्ग करण्याच्या सूचना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांना दिल्या, तर राज्याकडून थकलेल्या मानधनाचाही प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
१० सप्टेंबरपासून सुरू असणाऱ्या काम बंद आंदोलनाचा भाग म्हणून आशांनी मंत्री मुश्रीफ यांची भेट घेऊन आपली गाऱ्हाणी मांडली. राज्य व जिल्हास्तरीय थकीत, तसेच वाढीव मानधन मिळावे, ग्रामपंचयतीकडून कोविड प्रोत्साहन भत्ता फरकासहीत मिळावा, गटप्रवर्तकांना साॅफ्टवेअर भत्ता वर्ग करावा, आरोग्यवर्धिनीमध्ये समावेश करून त्यांना प्रोत्साहन भत्ता त्वरित मिळावा अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी ‘सिटू’चे जिल्हाध्यक्ष काॅ. भरमा कांबळे, जिल्हा सचिव कॉ. शिवाजी मगदूम, आशा जिल्हा संघटक कॉ. नेत्रदीपा पाटील, उज्ज्वला पाटील, मनीषा पाटील, माया काशीद, सविता आडुरे, राणी मगदूम, शोभा संकपाळ, सुंनदा सोळसे, उज्ज्वला मेंगाणे यांच्यासह आशा उपस्थित होत्या.
गौरी गीतांऐवजी आशांनी गायिली गाऱ्हाणी
आरोग्य विभागाची मदार असणाऱ्या आशांना सहा महिन्यांपासून मानधनच नाही, जूनमधील वाढीव भत्त्याचा जीआरही नसून कोविड सेवेसाठी असणारा भत्ताही बंद केला. याबाबत दोन महिन्यांपासून निवेदने देऊनही दुर्लक्षच केले. आज महिलांचा गौरीचा महत्त्वपूर्ण सण असतानाही आशांनी मानधनाच्या जिव्हाळ्याच्या विषयाला प्राधान्य देत लक्ष वेधले.
...
तर १५ रोजी निदर्शने
अधिकाऱ्यांचे पगार वेळेवर होतात. मग, आशांचे मानधन का थकते. गौरीच्या सणाला आम्हाला मानधन न मिळाल्याने काम बंद आंदोलन सुरू आहे. शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आशा १५ सप्टेंबर रोजी रस्त्यावर उतरून निदर्शने करतील, असा इशारा जिल्हाध्यक्षा नेत्रदीपा पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.