शिरोळ/ नृसिंहवाडी
: कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांनी एकत्र येऊन एकमताने ठराव मंजूर करावा, पुनर्वसनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावू, शिरोळ तालुक्याला वरचेवर भेडसावणाऱ्या महापुराबाबत कायमचा तोडगा काढू, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी शुक्रवारी शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार उल्हास पाटील, दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, शिवसेनेचे मुरलीधर जाधव, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे, गट विकास अधिकारी शंकर कवितके, उपनगराध्यक्ष राजेंद्र माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
नृसिंहवाडी येथे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पूरपरिस्थितीची पाहणी करून बाधित नागरिकांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिरोळ तालुक्याला भेडसावणाऱ्या महापुराबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
चौकट..शिरोळ येथे मुख्यमंत्र्यांसमोर प्रश्नांचाही पूर
शिरोळ येथील पद्माराजे हायस्कूल निवारा केंद्रात भेटीदरम्यान पूरग्रस्तांनी पावसाळ्यात चार महिन्यांसाठी आमचं पुर्नवसन करा, जाहीर केलेली दहा हजारांची मदत तोकडी आहे. गावाकडे गेल्यानंतर रोजीरोटीचा प्रश्न आहे, अशा व्यथा मांडल्या. तर नृसिंहवाडी येथे स्थानिकांनी २०१९ चा पूर, सध्याची कोरोना परिस्थिती व आता आलेला महापूर यामुळे येथील सर्वच जनजीवन विस्कळीत झाले असून याबाबत ठोस कार्यवाही व्हावी, अशी मागणी केली.
चौकट..मुख्यमंत्र्याकडे मागणी
मुख्यमंत्री ठाकरे यांनी दत्त कारखाना कार्यस्थळी भेट देत कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्याशी संवाद साधून पूर परिस्थितीची माहिती घेतली. राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांचे कायमस्वरूपी पुनर्वसनाची मागणी करुन मदतीच्या निकषात बदल करण्याची मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली.
फोटो ओळ : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नृसिंहवाडी येथे स्वागत कमानीजवळ महापुरांची पाहणी करून माहिती घेतली. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार धैर्यशील माने आदी उपस्थित होते.