कोल्हापूर : आम्ही सारे पानसरे, आम्ही सारे दाभोलकर, विवेकाचा आवाज बुलंद करूया, भारतीय संविधान जिंदाबाद, अशा घोषणा देत शुक्रवारी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने निर्भय मॉर्निंग वॉक काढण्यात आले. यावेळी शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर व गोविंद पानसरे यांच्या खुन्यांना पकडू न शकलेल्या सरकारचा निषेध करण्यात आला.
डॉ. दाभोळकर यांच्या खुनाला ८ तर पानसरे यांच्या खुनाला साडेपाच वर्षे झाली तरी पोलीस मास्टरमाइंडपर्यंत पोचले नाहीत. याच्या निषेधार्थ उभा मारुती चौक ते बिंदू चौक असा भव्य निर्भय मॉर्निंग वाॅक काढण्यात आला. अनिल चव्हाण यांनी धर्मांध संघटनेच्या साधकांची नोंद पोलिसात करावे, खुनाच्या मास्टर माईंडला पकडावे, अशी मागणी केली. डॉ. विलासराव पोवार यांनी देशाची प्रगती व्हायची असेल तर वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्याचे आवाहन केले. चंद्रकांत यादव यांनी पुरोगामी शक्तींचा सामना करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र व्हावे, असे सांगितले.
यावेळी बुवाबाजी समाजाला लागलेली कीड या विषयावरील निबंध स्पर्धेच्या पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. यावेळी ॲड. अजित चव्हाण, प्रा डॉ. छाया पोवार, मेघा पानसर, सतीशचंद्र कांबळे प्रा. सुभाष जाधव, सुरेश सूर्यवंशी, चंद्रकांत पाटील, प्रा. डाॅ.टी. एस. पाटील, शाहीर राजू राऊत, सीमा पाटील, संजय अर्दाळकर, अतुल दिघे, वसंतराव पाटील, सुनंदा चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----
फोटो नं २००८२०२१-कोल-मॉर्निंग वॉक
ओळ : कोल्हापुरातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने शुक्रवारी निर्भय मॉर्निंग वॉकद्वारे डॉ. नरेंद्र दाभोलकर व गोविंद पानसरे यांच्या खुन्यांना पक़डण्यात अपयशी ठरलेल्या शासनाचा निषेध करण्यात आला. (आदित्य वेल्हाळ)
----