कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय युवा फुटबॉलस्टार अनिकेत जाधवची इंग्लंड येथील ‘ब्लॅकबर्न रोव्हर्स फुटबॉल क्लब’ या इंग्लिश प्रीमियर लीगमधील व्यावसायिक क्लबकडे तीन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली.सतरा वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेनंतर अनिकेतने प्रथम इंडियन अॅरोज या भारतीय फुटबॉल महासंघाच्या आयलीग संघाकडून प्रतिनिधित्व केले. त्यानंतर तो सध्या जमशेदपूर एफसी या आयलीगमधील व्यावसायिक संघाशी करारबद्ध झाला आहे.
याच क्लबकडून आणखी चांगली कामगिरी करावी. याकरिता त्याची या क्लबने इंग्लंड येथील ब्लॅकबर्न, लंकाशायर येथील प्रसिद्ध ब्लॅकबर्न रोव्हर्स फुटबॉल क्लबकडे तीन महिन्यांच्या तंत्रशुद्ध प्रशिक्षणासाठी निवड केली आहे.
या कालावधीत तो ब्लॅकबर्न रोव्हर्स संघातील आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर सराव व सामनेही खेळणार आहे. त्यामुळे त्याच्यात युरोपियन लीगमध्ये कोणते तंत्र अवलंबले जाते, याबद्दलचा जवळून त्याला अभ्यास करता येणार आहे. विशेष म्हणजे या क्लबचे स्व:मालकीचे ३२ हजार प्रेक्षक बसतील एवढे सुसज्ज स्टेडियमही आहे.
या क्लबकडून डेरीक विल्यिम्स (आर्यलंड), डॅनी ग्रॅम (इंग्लंड), रेयॉन नमबिया (दक्षिण आफ्रिका), चार्ली मुलग्रेव्ह (स्कॉटलँड), जॅक रोडवेल (इंग्लंड) आदी दिग्गज खेळाडू खेळत आहेत. त्यामुळे अनिकेतलाही या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूंबरोबर सरावासह स्पर्धाही खेळता येणार आहे. त्याचा फायदा जमशेदपूर एफसी क्लबबरोबरच भारतीय युवा संघालाही होणार आहे. तो या दौऱ्यासाठी पुढील आठवड्यात रवाना होणार आहे.