सरूड : शाहूवाडी व शिराळा तालुक्यांच्या सीमेवर असणाऱ्या वारणा नदीकाठाशेजारील परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर असून पाळीव प्राण्यांवर हल्ले करून या बिबट्याने वारणा नदीकाठी दहशत निर्माण केली आहे.
सरूड गावापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर वारणा नदीच्या पलीकडे शिराळा तालुक्यातील कणदूर व पुनवत गावच्या हद्दीत हा बिबट्या गेल्या पंधरा दिवसांपासून तळ ठोकून आहे. या बिबट्याने गेल्या आठवडयात कणदूर गावातील संपत सदाशिव पाटील यांचे एक वासरू व आनंदा बबन पाटील यांच्या दोन शेळ्यांचा फडशा पाडला आहे. तर दोन दिवसांपूर्वी पुनवत येथील बाबासो भोळे व संभाजी भोळे यांच्या मालकीच्या सात शेळ्यांसह एक बोकड व कुत्रा या बिबट्याने ठार केले आहेत. सध्या या बिबटयाचे वास्तव्य नदीकाठापलीकडे असून शाहूवाडी तालुक्यातील सरुड, वडगाव, वारणा कापशी, शिवारे या गावांपासून हे अंतर अवघे तीन ते चार किलोमीटर एवढे आहे . गेल्या महिन्यात याच बिबट्याचा वावर शाहुवाडी तालुक्यातील भेडसगाव परिसरात असल्याचे येथील शेतकऱ्यांतून सांगण्यात येत आहे. त्यामुळे शाहुवाडी व शिराळा तालुक्यांच्या सीमेवर असणारा वारणा नदीकाठ हा या बिबट्याचे आश्रयस्थान बनले आहे. सध्या नदीपलीकडे असणारा हा बिबट्या शिकार शोधण्याच्या माध्यमातून शाहूवाडी तालुक्याच्या हद्दीतही येण्याची शक्यता आहे . बिबटयाच्या वाढत्या हल्ल्यामुळे या परिसरातील पाळीव प्राण्यांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शाहुवाडी व शिराळा या दोन्ही तालुक्यांतील वारणा नदीकाठाशेजारील गावांमधील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे .