कोल्हापूर : येथे जन्मलेल्या आणि शिक्षण घेतलेल्या लीना नायर यांना ब्रिटिश राजघराण्याचा ‘ऑडर्र ऑफ दि ब्रिटिश एम्पायर’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. याआधी आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कारांच्या मानकरी ठरलेल्या लीना यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.ब्रिटिश राजघराण्याकडून अनेक पुरस्कार प्रदान केले जातात. रिटेल आणि कंझ्युमर क्षेत्रातील नायर यांच्या कामकाजाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. नायर यांचे माध्यमिक शिक्षण येथील होली क्रॉसमध्ये १९८५ साली झाले असून, वालचंद येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन्स विषयातील पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी जमशेदपूर येथून एमबीएचे शिक्षण घेतले. येथील फौंड्री उद्योजक कार्तिकेयन यांच्या त्या कन्या आहेत.अभियंता बनण्यासाठी शिक्षण घेतलेल्या नायर या व्यवस्थापन क्षेत्राकडे आकर्षित झाल्याने त्यांचे वडील नाराज झाले होते; परंतु नंतर मात्र त्यांनी याच क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर एकापेक्षा एक टप्पे गाठले. हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीच्या त्या २०१६ साली मुख्य मनुष्यबळ संसाधन अधिकारी बनल्या. फ्रेंच लक्झरी ब्रँड असलेल्या चॅनलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सध्या त्या कार्यरत आहेत.
लीना नायर यांना ब्रिटिश राजघराण्याचा पुरस्कार, कोल्हापुरात झाला जन्म अन् शिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 11:58 IST