हरी बुवा
शिये : शिये फाट्यावर व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे हा रस्ता प्रचंड वाहतूक कोंडीचा बनला आहे. या अतिक्रमणाबाबत आवाज उठवूनही प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नाही. विशेष म्हणजे शिये फाटा ते
बावडा पुलापर्यंत रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यमार्ग १९४ शाहू नाका-बालिंगे-निगवे दुमाला-शिये- बावडा या रस्त्याची हद्द निश्चित करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाकडे दोन वर्षांपूर्वी दोन लाख बावीस हजार रुपये भरले होते. मात्र, अद्यापही या जागेची मोजणी करण्यास संबंधित कार्यालयाला वेळ मिळालेला नाही. त्यामुळे अतिक्रमणाला एकप्रकारे प्रशासनाकडूनच अभय दिले जाते की काय अशी शंका निर्माण होत आहे. शिये फाटा ते बावडा पुलापर्यत रस्त्यालगत असणाऱ्या टपऱ्यांमुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. ही मोजणी झाल्यास यावरील अतिक्रमण काढणे प्रशासनास सहजशक्य होणार आहे. पुणे -बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिये फाटा येथे रस्त्यावरच विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटल्याने हा रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा होत असल्याच्या तक्रारी येथील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केल्या आहेत. रस्त्यालगत असणाऱ्या टपऱ्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने नोटीस बजावली असून राज्यमार्ग १९४ वरील शिये फाटा ते बावडा पुलापर्यंत रस्त्याची हद्द निश्चित करण्यासाठी बांधकाम विभागाने करवीर उपअधीक्षक, भूमी अभिलेख यांच्या नावाने दोन लाख बावीस हजारांचा धनादेश दिला होता. मात्र, अद्यापही या जागेची मोजणी करण्यात आलेली नाही. यामुळे या रस्त्यावर अतिक्रमणे वाढतच असल्याचे चित्र आहे.
कोट : या रस्त्यावरील अतिक्रमणधारकांना नोटीस बजावली असून भूमी अभिलेख कार्यालयाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याची हद्द निश्चितीसाठी मोजणी केली जाणार आहे. हद्द निश्चितीनंतर लगेचच कारवाई करु.
सी . एन . भोसले ( शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम)
कोट : राज्य मार्गावरील अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा होत असल्याचे तक्रारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार केल्या आहेत; पण फक्त नोटीस बजावण्यापलीकडे संबंधित विभाग कोणतीच कारवाई करीत नाही.
संकेत सावंत, नागरिक
चौकट :
शिरोली औद्योगिक वसाहत, कसबा बावडामार्गे कोल्हापूर, जोतिबा, पन्हाळा, रत्नागिरी या ठिकाणी जाण्यासाठी शिये फाटा सोयीचा मानला जातो; पण येथील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या समस्येवर ठोस पावले उचलण्याची गरज आहे. त्याशिवाय राज्यमार्गावरील हद्द निश्चत करून येथील अतिक्रमणावरही हातोडा मारणे गरजेचे आहे.