कोल्हापूर : ‘शहीद डॉ. एम. एम. कलबुर्गी अमर रहे’, ‘डॉ. कलबुर्गी का अधुरा काम पुरा हम करेंगे’, अशा घोषणा देत शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सोमवारी ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत डॉ. कलबुर्गी यांना आदरांजली वाहिली. आॅल इंडिया स्टुडंटस् फेडरेशन व अखिल भारतीय नौजवान सभेतर्फे विद्यापीठाच्या ग्रंथालयासमोर शोकसभा घेण्यात आली.ग्रंथालयासमोर दुपारी साडेतीन वाजता सुमारे पाचशेहून अधिक विद्यार्थी, विद्यार्थिनी संघटित झाल्या. त्यांनी येथे ‘विवेकवादाचा विजय असो’, ‘धर्मनिरपेक्षता झिंदाबाद’, ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विजय असो’, ‘शहीद डॉ. एम. एम. कलबुर्गी अमर रहे’, अशा घोषणा देत डॉ. कलबुर्गी यांना आदरांजली वाहिली. यावेळी वर्ल्ड फेडरेशन आॅफ डेमोक्रेटिक यूथचे जागतिक उपाध्यक्ष गिरीश फोंडे म्हणाले, डॉ. नरेंद्र दाभोलकर, ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या खुन्यांना जर वेळीच शिक्षा झाली असती तर, डॉ. कलबुर्गी यांना वाचविता आले असते. समाजातील युवकांनी पुढे येऊन अशा संकटांचा, जातीयवाद, धर्मांधतेचा मुकाबला करावा. डॉ. एस. एस. महाजन म्हणाले, प्रतिमागी व पुरोगामी हा जुना संघर्ष आहे. बळिराजासारखे आदर्श प्रतिगाम्यांनी संपविण्याचा प्रयत्न केला आहे. उत्तर विचारानेच दिले पाहिजे. डॉ. गजानन अपिणे म्हणाले, शरीर संपविण्याने विचार संपत नाही. सत्याचा, चिकित्सेचा लढा सुरूच राहील. यावेळी प्रशांत आंबी, विश्वजित भोसले, उदय कांबळे, योगेश फोंडे, मयूरेश पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘कलबुर्गी का काम पुरा हम करेंगे...’
By admin | Updated: September 1, 2015 00:26 IST