जयसिंगपूर : शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून, आमदार राजेश क्षीरसागर गैरसमज पसरवीत आहेत. राजेश क्षीरसागर यांना शक्तिपीठ महामार्गास जमीन पाहिजे असल्यास त्या बदल्यात त्यांच्या मालकीच्या जयप्रभा स्टुडिओमधील जागा शेतकऱ्यांच्या नावावर करण्याची मागणी निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील शक्तिपीठ महामार्गबाधित शेतकऱ्यांनी केली आहे.निमशिरगावमधील सर्व बाधित शेतकऱ्यांनी एकत्र येत शक्तिपीठ महामार्गास कडाडून विरोध केला. यावेळी सरपंच अश्विनी गुरव यांना निवेदन देण्यात आले. राजेश क्षीरसागर यांच्या भूमिकेमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जेवढी जमीन शक्तिपीठ महामार्गास जाणार आहे, त्या बदलात जयप्रभा स्टुडिओची जागा राजेश क्षीरसागर शेतकऱ्यांच्या नावावर करत असेल तर खुशाल जमिनी घ्याव्यात, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली.शेतकऱ्याचे नाव, गट नंबर शक्तिपीठ महामार्गास विरोध असल्याचा फलक हातात धरून एकमताने शेतकऱ्यांनी विरोध केला. नवीन शक्तिपीठ महामार्ग झाल्यास शेकडो एकर जमीन संपादित जाणार आहे. यामुळे अनेक कुटुंबे भूमिहीन झाल्यावर भविष्यातील पिढीला जमिनी शिल्लक राहणार नसल्याचेही शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले. यावेळी शिवाजी कांबळे, शांताराम कांबळे, प्रदीप पाटील, राजगोंडा पाटील, शंकर पाटील, विक्रम चौगुले, अजित पाटील, अविनाश कोडोले, अमोल पाटील, स्वस्तिक पाटील, सुधाकर पाटील उपस्थित होते.
Kolhapur: क्षीरसागर यांनी जयप्रभा स्टुडिओमधील जागा शेतकऱ्यांना द्यावी, निमशिरगाव येथे शक्तिपीठला विरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 16:42 IST