कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ येथील वसतिगृहाच्या तीन इमारतींमध्ये सुरु करण्यात येणाऱ्या कोविड केअर सेंटरची गुरुवारी प्रशासक कादंबरी बलकवडे व पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पाहणी केली. याठिकाणची स्वच्छता, बेडची व्यवस्था, इलेक्ट्रिक व फायर ऑडिटची पूर्तता, ऑक्सिजन बेडची व्यवस्था व स्टाफची नियुक्ती तत्काळ करण्याच्या सूचना प्रशासक बलवकडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
कोल्हापूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. महापालिकेने अलिकडेच शिवाजी विद्यापीठ डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी (डीओटी), आयसोलेशन रुग्णालय येथे कोविड केअर सेंटर सुरु केले आहे. डीओटी येथे ३५० बेडचे सेंटर सुरु झाले आहे. सध्या याठिकाणी ८४ व्यक्तींचे संस्थात्मक विलगीकरण केले आहे. या आयसोलेशन रुग्णालयात ७१ बेडचे कायमस्वरुपी कोविड केअर सेंटर सुरु आहे.
महापालिकेने आता शेंडा पार्क येथील आरोग्य प्रशिक्षण केंद्र व अंडी उबवणी केंद्र याठिकाणी कोविड केअर सेंटरची तयारी पूर्ण केली आहे. डीओटी व आयसोलेशन येथील बेड जसे भरतील तशी इतर सेंटर सुरु करण्यात येणार आहेत. याठिकाणी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, उपायुक्त रविकांत आडसूळ, शिवाजी विद्यापीठ कुलसचिव डॉ. व्ही. डी. नांदवडेकर, प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश पावरा, सहाय्यक अभियंता चेतन लायकर उपस्थित होते.
फोटो क्रमांक - १५०४२०२१-कोल-केएमसी०२
ओळ - कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे शिवाजी विद्यापीठातील वसतिगृहाच्या इमारतीत उभारण्यात येत असलेल्या कोविड केअर सेंटरची गुरुवारी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे व पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पाहणी केली. यावेळी उपायुक्त रविकांत आडसुळ उपस्थित होते.