जयसिंगपूर : कोंडिग्रे (ता. शिरोळ) येथे अनोळखी महिलेचा झालेला खून हा चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केल्याचे जयसिंगपूर पोलिसांनी उघडकीस आणले. नर्मदा किरण माचरे (वय ३०, रा. खोतवाडी, ता. हातकणंगले) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून, पती किरण जालिंदर माचरे याला पोलिसांनी अटक केली. १३ डिसेंबर रोजी कोंडिग्रे गावाच्या हद्दीत जेठाप्पाचा माळ याठिकाणी अनोळखी महिलेचा मृतदेह सडलेल्या स्थितीत मिळून आला होता. चेहरा व अंगावरील काही भाग कुत्र्यांनी खाल्लेला होता. मात्र महिलेच्या अंगावरील कपड्यांच्या आधारे पोलिसांनी शोध घेतला असता खोतवाडी येथून एक महिला बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. नर्मदाला पतीने माहेरी पुणे येथे पाठविल्याचे नातेवाईकांनी सांगितले. मात्र ती माहेरी नसल्याची माहिती मिळाली. शिवाय पतीही खोतवाडीत नसल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने पोलिसांचा संशय बळावला. अधिक शोध घेतला असता वाई खानापूर येथे किरण हा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याला सापळा रचून पोलिसांनी ताब्यात घेतले. तपासात त्याने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली दिली. उद्या, रविवारी त्याला न्यायालयात उभे केले जाणार आहे. (प्रतिनिधी)
कोंडिग्रेतील महिलेचा खून पतीकडून
By admin | Updated: December 21, 2014 00:38 IST