कोल्हापूर : मुंबई, बंगलोर, हैदराबाद येथून ट्रॅव्हल्सच्या बसमधून येणारे प्रसिद्ध कंपन्यांचे कपडे बसचालकाला हाताशी धरून चोरणाऱ्या सराईत चोरट्यास राजारामपुरी पोलिसांनी मंगळवारी (दि. ११) अटक केली.
संशयित बादशहा इम्रान शेख (वय ३०, रा. नेहरूनगर, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून साडेसहा लाख रुपये किमतीचे कपडे जप्त केले. त्याच्याकडून आणखी काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे निरीक्षक औदुंबर पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
गेल्या तीन-चार वर्षांपासून बादशहा शेख हा संशयित असे कपडे चोरून विकत होता. यामध्ये मोठी साखळी आहे. राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक पाटील यांना खबऱ्यामार्फत ही माहिती मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी सापळा रचून मंगळवारी सायंकाळी बादशहा शेख याला अटक केली. त्याच्या नेहरूनगर येथील भाड्याच्या घराची झडती घेतली असता साडेसहा लाख रुपये किमतीचे विविध कपडे आढळून आले.
यामध्ये खासगी आराम बसचालक, क्लीनर, कपडे विक्री करणारे दुकानदार यांच्यावरही कारवाई होणार असल्याची माहिती निरीक्षक पाटील यांनी दिली. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक अण्णाप्पा कांबळे, कॉन्स्टेबल प्रकाश पारधी, अमोेल अवघडे, गौरव चौगले, संजय जाधव, सिद्धेश्वर केदार, रजनीकांत कांबळे, भूषण ठाणेकर, आदींनी केली.मॉल, व्यापाऱ्याशी संपर्कसंशयित बादशहा शेख याने चोरलेले कपडे हे शहरातील मोठे मॉल आणि कापड व्यापाऱ्यांचे आहेत. बाहेरून कपडे मागविणाऱ्या मॉल, व्यापाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्या आॅर्डरीमध्ये कपडे कमी पडले आहेत का, याची चौकशी सुरू आहे. बसमधून कोणी आॅर्डर मागविली होती, त्या व्यापाऱ्यांची नावे पोलीस शोधत आहेत.