कोल्हापूर : ‘लोकमत’ महामॅरेथॉनमध्ये ‘सुपर क्लासवन’ अधिकारीही धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 05:05 PM2018-12-26T17:05:36+5:302018-12-26T17:10:59+5:30
कोल्हापुरात सहा जानेवारी २०१९ ला होणाऱ्या ‘व्हिंटोजिनो’ प्रस्तुत पॉवर्ड बाय ‘माणिकचंद आॅक्सिरिच’ लोकमत महामॅरेथॉनची घोषणा होताच संपूर्ण महाराष्ट्रासह शेजारील उत्तर कर्नाटक, गोव्यामधील धावपटूंना सहभागी होण्याची प्रचंड उत्कंठा निर्माण झाली आहे. यासोबतच कोल्हापूर जिल्ह्यातील सुपर क्लासवन अधिकारीही या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत.
कोल्हापूर : कोल्हापुरात सहा जानेवारी २०१९ ला होणाऱ्या ‘व्हिंटोजिनो’ प्रस्तुत पॉवर्ड बाय ‘माणिकचंद आॅक्सिरिच’ लोकमत महामॅरेथॉनची घोषणा होताच संपूर्ण महाराष्ट्रासह शेजारील उत्तर कर्नाटक, गोव्यामधील धावपटूंना सहभागी होण्याची प्रचंड उत्कंठा निर्माण झाली आहे. यासोबतच कोल्हापूर जिल्ह्यातील सुपर क्लासवन अधिकारीही या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत.
यात विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, श्रीनिवास घाटगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, करवीरचे पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव, जिल्हा क्रीडाधिकारी चंद्रशेखर साखरे आदी अधिकाºयांचा समावेश आहे.
‘आरोग्यासाठी धावा’ अशी साद देत ‘लोकमत’ने कोल्हापूरमध्ये सहा जानेवारीला आयोजित केलेल्या महामॅरेथान स्पर्धेच्या नोंदणीसाठी प्रतिसाद वाढत आहे. स्पर्धेचे काऊंटडाऊन सुरू झाले असून, नावनोंदणीसाठी आता अवघा एकच दिवस उरला आहे.
विशेष म्हणजे या महामॅरेथॉनमध्ये आपला सहभाग निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटक, गोवा आदी ठिकाणांहून धावपटू, प्रौढ धावपटू, नागरिक, महिला व उद्योन्मुख खेळाडूंत चढाओढ निर्माण झाल्याचे चित्र आहे. गतवर्षी कोल्हापुरात झालेल्या महामॅरेथॉनला क्रीडारसिक, खेळाडू, ज्येष्ठ नागरिक व महिलांसह धावपटूंसाठी जबरदस्त प्रतिसाद लाभला होता.
अद्ययावत तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग झालेली अत्युच्च दर्जाची लोकमत समूहाची कोल्हापुरातील ही मॅरेथॉन असल्याची सहभागी धावपटूंची प्रतिक्रिया होती. यंदाही सहा जानेवारीला होणारी महामॅरेथॉनदेखील आणखी सरस होणार असल्याचा विश्वास सहभागी होणाऱ्या धावपटूंमध्ये आहे. त्यामुळे सहा जानेवारीला होणाऱ्यां महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याची ओढ सर्वांना लागून राहिली आहे.
यंदाच्या या महामॅरेथॉनमध्ये विशेष ठसा उमटविण्यासाठी तासन्-तास धावपटू कसून सराव करत आहेत. त्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी महामॅरेथॉनची तयारी करणारे युवकांचे जथ्येच्या जथ्ये सकाळी पाहण्यास मिळत आहेत.
विशेषत: शिवाजी विद्यापीठ परिसर, पुईखडी परिसर, कसबा बावडा रोड, कोल्हापूर-रत्नागिरी राज्यमार्ग आदी ठिकाणी सराव करणारे धावपटू दिसत आहेत. यासह लहानगेही काही सरावात मागे नाहीत तेही भल्या पहाटे उठून रंकाळा तलाव, पीडब्ल्यूडी मुख्य कार्यालयाचा परिसर, ताराबाई पार्क, आदी ठिकाणी आपल्या पाल्यांबरोबर ही मंडळी दिसत आहेत.
यात जिल्हा प्रशासानातील अधिकारीवर्गही मागे नाही. ही मंडळीही सकाळी सर्व व्याप सांभाळून २१ आणि १० किलोमीटर धावण्याचा कसून सराव करत आहेत. यात काही अधिकारी तर २१ किलोमीटर धावण्याबरोबरच सायकलिंगचाही विशेष सराव करत आहेत. त्यामुळे स्टॅमिना वाढण्यास फायदा होत असल्याची भावना अनेक अधिकारी मंडळींनी व्यक्त केली आहे.
धावाल तर जगाल ....: डॉ. प्रशांत अमृतकर
लोकमत समूहातर्फे सहा जानेवारीला आयोजित केलेली महामॅरेथॉन ही कोल्हापूरसह परिसरातील धावपटूंसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. मी स्वत:ही धावणार आहे. तुम्ही धावावे. आरोग्यासाठी धावणे हितकारक असते, असे मत शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी व्यक्त केले.
धावणे हे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. याशिवाय धावपळीच्या जगात मन प्रफुल्लित ठेवण्यासाठी धावणे ही बाब महत्त्वाची ठरत आहे. धावण्यामुळे निसर्गाशी एक नाते जुळते. त्यामुळे मीही ६ जानेवारीला ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये धावणार आहे. तुम्हीही धावावे. वेगवेगळ्या वयोगटांतील, घटकांतील लोक एकत्र येणे हा चांगला संदेश आहे. महामॅरेथॉन हा चैतन्याचा सोहळा आहे. त्यामुळे अनेक लोक ‘लोकमत’शी जोडले गेले आहेत. त्यांपैकीच मीही एक आहे.
खेळाडूंना या मॅरेथॉनमुळे एक व्यासपीठ मिळणार आहे. यात सहभाग नोंदविणे आणि मॅरेथॉनचा आनंद उपभोगणे ही एक संधी आहे. खासकरून युवावर्गाने धावण्यासारखा व्यायाम करणे आजच्या काळात तरी गरजेची बाब बनली आहे. स्पर्धात्मक परीक्षा देताना पोलीस खाते, वनखाते, आदी क्षेत्रांत प्रवेश करताना शारीरिक कस पाहिला जातो. त्यात धावण्याचीही शर्यत नव्हे, तर परीक्षाच असते. त्यात कमीत कमी वेळेची नोंद या परीक्षेत घेतली जाते आणि जो कमी वेळेत ठरविलेले अंतर पार करतो, तोच स्पर्धात्मक परीक्षेत यशस्वी होतो.
याशिवाय धावण्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्या कार्यान्वित होतात. त्यामुळे शरीराला एकप्रकारे चांगली ऊर्जा दिवसभर मिळते. कोल्हापूर निसर्गाने नटलेले आहे. त्यात सकाळच्या प्रहरी धावल्यामुळे मनही प्रफुल्लित राहते. ‘लोकमत’नेही संधी सर्वांसाठी उपलब्ध केली आहे. त्यात सहभागी होऊन लाभ घ्यावा.
सर्वांग सुंदर व्यायाम : सूरज गुरव
कोणतेही साहित्य न लागणारा बिन पैशांचा सर्वांत सुंदर असा व्यायाम म्हणजे धावणे होय. सकाळच्या प्रहरी किमान तासभर चालणे, धावणे यामुळे आयुष्य निरोगी राहण्यास मदत होते. त्यामुळे धावा आणि आरोग्यदायी जीवनाचा आनंद घ्या, असे मत करवीरचे पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी व्यक्त केले.
मी माझ्या शालेय जीवनापासून विविध खेळांबरोबर धावणे कायम ठेवले आहे. विशेषत: मी स्वत: एक गिर्यारोहक असल्याने मला चालणे, धावणे मनस्वी आनंद देणारी बाब आहे. त्यामुळे दररोज किमान पाच ते दहा किलोमीटर धावतो. माणसाने सातत्याने धावले तरच त्यांच्यामध्ये उत्साहाचा झरा वाहतो.
विशेषत: सकाळच्या वेळी धावणे शरीराला उपयोगी असते. मी स्वत: शिवाजी विद्यापीठ परिसरात दररोज आणि कामाच्या व्यापातून पहाटेच्यावेळी ५ ते १० किलोमीटर धावतो. धावण्यामुळे मला जीवनात अनेक चांगल्या गोष्टी मिळाल्या. त्यात एमपीएससीमध्ये धावण्यामुळे कस लागणाऱ्या अनेक शारीरिक कसोट्या सहज पार केल्या. त्यामुळे माझी पोलीस उपअधीक्षक पदावर निवड झाली.
धावणे ही जीवनाची गुरूकिल्ली असल्याने माझ्या अनेक व्याख्यानात नवोदित परीक्षार्थींना मी दररोज व्यायाम करणे व धावणे ही महत्त्वाची बाब असल्याचे आवर्जून सांगतो. ‘लोकमत समूहा’ने राज्यात महामॅरेथॉनच्या रूपाने एक संधी कोल्हापूरसह राज्यभरातील धावपटू, नागरिकांना दिली आहे. त्यात मीही एक नागरिक म्हणून सहा जानेवारीला होणाºया कोल्हापुरातील महामॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहे. तुम्हीही ही सहभागी होण्याची नामी संधी सोडू नका.
धावपळीच्या युगात धावणे उत्तम व्यायाम :चंद्रशेखर साखरे
नव्वदीनंतर देशात मोबाईल क्रांती झाली आणि एका बाजूने युवकांमध्ये व्यायामावर अवकळा आली . त्यामुळे शरीराला कसून व्यायाम राहिलाच नाही. युवाशक्ती सर्व अनेक आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त झाली. त्यात अनेकांना हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, आदी आजारांनी ग्रासले आहे. या सर्व गोष्टी टाळायच्या असतील तर दररोज व्यायामाशिवाय पर्याय नाही. त्यात धावणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे, असे मत जिल्हा क्रीडाधिकारी चंद्रशेखर साखरे यांनी व्यक्त केले.
आजच्या आधुनिक जगात जो आरोग्यसंपन्न व सुदृढ असेल तोच खरा श्रीमंत म्हणण्याची वेळ आली आहे. कारण लहानवयातच अनेकांना अनेक व्याधींनी ग्रासले असते. ही बाब ध्यानी घेऊन युवकांनी अगदी शालेय जीवनापासूनच व्यायाम करावा.
विशेषत: धावण्यासारख्या व्यायाम आवश्यक आहे. त्यात ‘दुग्धशर्करा योग’ म्हणून ‘लोकमत’ने गेल्यावर्षीपासून कोल्हापुरात महामॅरेथॉनच्या रूपाने सर्वांना संधी निर्माण करून दिली आहे. त्यात मीही सहभागी होऊन धावणार आहे. तुम्हीही जरूर सहभागी व्हावे. कारण अशी संधी वारंवार येत नाही.
यावर्षी महामॅरेथॉन फन रन (१२ वर्षांपेक्षा जास्त धावण्याचा छंद असणाऱ्यांसाठी), १० किलोमीटरची पॉवर रन (१६ पेक्षा जास्त वर्षांवरील) आणि २१ किलोमीटर (१८ पेक्षा जास्त) असणार आहे. त्यात फॅमिली रन तीन किलोमीटर अंतराची राहणार आहे. ती सर्व वयोगटांसाठी खुली आहे.
लष्कर, पोलीस दलातील धावपटूंसाठी वेगळा गट ठेवला आहे. विदेशातील स्पर्धकांनाही या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध आहे. या मॅरेथॉनमधील १० आणि २१ किलोमीटरची स्पर्धा पूर्ण करणाऱ्यां प्रत्येक धावपटूला कोल्हापूरचा नकाशा असलेली मेडल्स देण्यात येणार आहेत.