विश्वास पाटील कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाच्या अध्यक्षांना मी उचलून एक लाख रुपये दिल्याने रुकडी (ता. हातकणंगले) येथील खत कारखान्याच्या दुरुस्तीचे बिल वाढले, असे हे काम घेतलेल्या कंत्राटदाराने चक्क संघाच्या खरेदी समितीच्या बैठकीत सर्व संचालकांसमोरच गुरुवारी सांगितले. संघाच्या मुख्यालयात अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखालीच ही बैठक झाली. या कामासाठी मूळ सहा लाखांची मंजुरी असताना हा खर्च १३ लाखांवर गेल्याने संचालक मंडळाने त्यास मंजुरी दिली नाही. एकदा इंजिन खोलल्यावर खर्च वाढला तर तो द्यायला नको का, अशी सारवासारव अध्यक्षांनी केली. परंतु, कंत्राटदारांकडून त्यांनी एक लाख रुपये कशासाठी घेतले याचे कोणतेही समर्पक कारण त्यांना देता आले नाही.खरेदी समितीच्या बैठकीत सुरुवातीलाच खत कारखान्याचा खर्चाचा विषय चर्चेला आला. कंत्राटदाराचे बिल मंजूर होईल म्हणून तोदेखील उपस्थित होता. मूळ मंजुरीनुसार सहा लाखांचे काम साडेसहा लाख झाले. त्यास संचालकांची हरकत नव्हती. परंतु, आणखी एक सात लाखांचे बिल मंजुरीसाठी आल्यावर त्याची कारणे संचालकांनी विचारली. त्यावर ड्रमचे काम करावे लागल्याचे अध्यक्षांनी सांगितले.नक्की काय काम केले हे विचारण्यासाठी बैठकीत कंत्राटदारांस बोलवले. या कंत्राटदाराच्या वडिलापासून संघाची कामे केली जात आहेत. वाढीव काम ७ लाख ७० हजारांचे झाल्याचे त्याने सांगितले. मग त्याचे ऑडिट करूनच बिल द्या, असा आग्रह संचालकांनी धरला. त्यावर तो कंत्राटदार घाबरला. त्याने ड्रमचे काम ५ लाखांत झाल्याचे सांगितले. अध्यक्षांना एक लाख दिले आणि जीएसटीमुळे लाखभर रुपये वाढल्याचा हिशेबच त्याने सांगितला. मग काही संचालकांनी अध्यक्षांना त्याबद्दल विचारणा केली. त्यांनी थातूरमातूर उत्तरे दिली.संघातील ऑईल विक्रीमध्येही २० लाख रुपयांचा ढपला मारला आहे. ही रक्कम संबंधितांकडून वसूल करावी, आम्ही त्यास जबाबदार नाही, असे काही संचालकांनी बजावले व त्यासही मंजुरी दिली नाही.
राजीनामा देण्यास टाळाटाळअध्यक्षांची वर्षाची मुदत संपली असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा यासाठी काही संचालकांनी बुधवारी आमदार सतेज पाटील व आमदार विनय कोरे यांची भेट घेतली. त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना फोन करून अध्यक्षांचा राजीनामा घ्यावा असे सुचवले. मंत्री मुश्रीफ यांनीही राजीनामा द्यायला सांगितले असल्याचे स्पष्ट केेले. परंतु, अध्यक्ष तो द्यायला तयार नाहीत. संघाची पुढील बैठक आता ११ मार्चला होणार आहे.
पगार संघाचा.. काम खासगी..संघाने कर्मचाऱ्यांना मोबाइलची सीमकार्डे दिली होती. त्यातील ३४ कर्मचारी आता सेवेतच नाही तरीही त्यांचे बिल संघ भरत होता, ती बंद करण्याचा निर्णय झाला. एका माजी ज्येष्ठ संचालकाच्या खासगी गाडीवर आजही संघाचाच कर्मचारी चालक असल्याचा मुद्दाही चर्चेत आला.