भारत चव्हाण कोल्हापूर : महानगरपालिकेचे विकासाचे कोणतेच काम वेळेवर पूर्ण होत नसल्याचा अनुभव नेहमी येत असतो; परंतु ताराबाई रोडवरील बहुमजली वाहनतळ इमारतीचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होऊनही तेथील विक्रेत्यांना दुकानगाळे देण्यास तसेच पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यास महापालिका प्रशासनाला मुहूर्त सापडलेला नाही.ज्या हेतूने ताराबाई रोडवर अंबाबाई मंदिर परिसर विकासांतर्गत बहुमजली वाहनतळ इमारत उभारली आहे, तो हेतू साध्य होण्यासाठी बेसमेंट, ग्राउंड आणि त्यावरील दोन माळे अशा चार माळ्यांवरील पार्किंग तातडीने सुरू करायला पाहिजे. महालक्ष्मी मार्केटमधील शंभरहून अधिक केबिनधारकांनी व्यवसाय करण्याकरिता रस्त्यावरच ठाण मांडले आहे. त्यांना या इमारतीत व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली, तर रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी होणार आहे; शिवाय भाविकांच्या वाहनांच्या पार्किंगची समस्याही दूर होणार आहे; परंतु पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होऊन तीन महिने झाले तरी महापालिका प्रशासन या गोष्टींकडे लक्षच द्यायला तयार नाही.अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्यातील दर्शनरांग, बहुमजली पार्किंग इमारत मंजूर आहे. दर्शनरांगेच्या जागेचा तिढा न सुटल्याने प्राधान्यक्रम बदलून दर्शनरांगेला मिळालेला निधी बहुमजली पार्किंग इमारतीवर खर्च करण्याचे ठरले. त्यानुसार ताराबाई रोडवर १२ कोटी रुपये खर्च करून बहुमजली वाहनतळ इमारत बांधण्यात आली. हे काम पूर्ण होऊन तीन-चार महिने झाले. महापालिका प्रशासनाने या इमारतीत व्यावसायिकांना गाळ्याचे वाटप करून व्यवसाय सुरू करण्यास तसेच वाहने पार्किंग करण्यास अद्याप परवानगी दिलेली नाही.ठेकेदाराने काम जलदगतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. या इमारतीत उपलब्ध केलेल्या १०४ गाळ्यांमध्ये फरशी बसविण्याचे काम सुरू असून चार आठ दिवसांत हेही काम पूर्ण होईल. परंतु महापालिकेलाच कामाची घाई झालेली नाही. ट्रान्स्फॉर्मर बसविलेला असला तरी लाइट फिटिंग करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. हे कामही तसे किरकोळ आहे. या कामास सुरुवात करण्याचे आदेशही दिले गेले नाहीत. त्यामुळे या इमारतीचे काम लवकर पूर्ण होऊच नये, असे अधिकाऱ्यांना वाटत असल्याची शंका येऊ लागली आहे.३७० वाहनांची सुविधापहिल्या टप्प्यातील बहुमजली पार्किंग इमारतीत २५० दुचाकी वाहने, तर १२० हून अधिक चारचाकी लावण्याची सोय झाली आहे. याशिवाय या इमारतीत १०४ गाळेधारक व्यवसाय करू शकणार आहेत.
दुसऱ्या टप्प्यातील कामाला गतीबहुमजली पार्किंग इमारतीत सध्या बेसमेंट, ग्राउंड आणि त्यावर दोन माळे बांधले गेले आहेत. आता दुसऱ्या टप्प्यात या इमारतीवर आणखी पाच माळे बांधले जाणार आहेत. त्यांतील दोन गाळे भक्तनिवासासाठी, तर आणखी तीन गाळे वाहनतळासाठी राखीव असतील. जवळपास १६ कोटींचे हे काम असून त्याला सुरवात झाली आहे.