कोल्हापूर :दिवसभराच्या उकाड्यानंतर सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता जिल्ह्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार तडाखा दिला. हेरले (ता. हातकणंगले) येथे चौगुले मळा येथील नागरी वस्तीत वीज पडून नारळाच्या झाडाने पेट घेतल्याने नागरिकांत एकच घबराट उडाली.
सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कानठळया बसविणाऱ्या मेघगर्जनेमुळे नागरिकांच्या मनात धडकी भरली. काही भागात झाडांच्या फांद्या तुटल्या आहेत. सुदैवाने कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. सुमारे एक तासाच्या पावसामुळे रस्ते जलमय झाले. पावसाला सुरुवात झाल्यानंतर हेरले परिसरातील विविध भागातील वीज पुरवठा काही वेळ खंडित झाला. यामुळे नागरिकांत आणखीच घबराट पसरली. जिल्ह्याच्या विविध भागातही जोरदार पाऊस झाला.